Type Here to Get Search Results !

ए.आय. तंत्रज्ञानामुळे वाणिज्य क्षेत्रात नवे रोजगार-चेतन गोडबोले


चंदगड : र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने “ए. आय. तंत्रज्ञानाचा वाणिज्य क्षेत्रातील वापर व रोजगाराच्या संधी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात पुणे येथील निलया कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


चेतन गोडबोले म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आता फक्त तांत्रिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून वाणिज्य, बँकिंग, लेखापरीक्षण, ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग व वित्त व्यवस्थापन या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. डेटा विश्लेषण, ग्राहक सेवा व नव्या व्यवसाय संधींसाठी ए. आय. हा आधारस्तंभ ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन आपले कौशल्य वाढवले, तर भविष्यातील वाणिज्य क्षेत्रात ए. आय. जाणकारांची मागणी प्रचंड वाढणार आहे.”


अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर समाधानी न राहता नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. स्पर्धात्मक युगात आपले स्थान निर्माण करण्यासाठी ए. आय. सारखी साधने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.”


प्रास्ताविकात डॉ. टी. ए. कांबळे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित ठेवता कामा नये. वाणिज्य क्षेत्रातील घडामोडी व प्रत्यक्ष व्यवहार समजावून देणे आवश्यक आहे. ए. आय. विषयक व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत व कौशल्यात नक्कीच सकारात्मक बदल होईल.”


या कार्यक्रमाला अकाउंट्स विभागप्रमुख प्रा. एस. के. सावंत, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. एस. सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.आभारप्रदर्शन प्रा. महादेव गावडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments