(कोवाड महाविद्यालयाचा 30 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात संपन्न,शिक्षणामुळे समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवणे ही काळाची गरज)
चंदगड/प्रतिनिधी : कोवाड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा 30 वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात, विविध उपक्रमांनी व सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात नाबार्डचे अध्यक्ष मा. यशवंतराव थोरात यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना “भविष्याला दिशा देण्याचे काम युवा शक्तीकडे आहे” असे प्रतिपादन केले.
थोरात म्हणाले, “शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे केंद्रस्थान आहे. तळागाळातील बहुजन समाजापर्यंत ही शैक्षणिक व्यवस्था पोहोचली पाहिजे. शिक्षणातून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि कृषीजीवनाचा विकास साधता येतो. आजच्या युवकांनी संशोधक दृष्टी ठेवून वेगवेगळी कला, कौशल्य आत्मसात केले पाहिजे. देशाच्या नसानसात असलेली तरुणाईची ऊर्जा वेगवेगळ्या क्षेत्रांत गगनभरारी घेईल, तेव्हाच राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य होईल.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए.एस. जांभळे होते. प्रारंभी विद्यार्थिनींच्या हस्ते मान्यवरांचे औक्षण व फलक पूजन झाले. रानभाज्या पाककृती स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या हस्ते झाले. "सर्वोदय" या भित्तिपत्रकाचे प्रकाशन डॉ. यशवंतराव थोरात यांनी केले. तर रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन डॉ. पी. बी. पाटील, प्राचार्य कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महाविद्यालयाने दिलेल्या योगदानाचे कौतुक करून शिक्षण व्यवस्थेला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमात डॉ. ए.एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील, गोविंद प्रभू पाटील, शाहू फर्नांडिस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते थोरात यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे व डॉ. आर. डी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. ए. के. कांबळे यांनी मानले.महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीए शाखांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वर्धापन दिन संस्मरणीय ठरला.
Post a Comment
0 Comments