Type Here to Get Search Results !

बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद

 


चंदगड (प्रतिनिधी): चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचा भव्य व ऐतिहासिक मेळावा प्रचंड उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शाहीर मधुकर कांबळे गवसे हे होते.


या मेळाव्याच्या सुरुवातीला संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे यांनी प्रास्ताविक करताना फुले–शाहू–आंबेडकरी विचारधारेचे महत्व अधोरेखित केले.“फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे उघडले, शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची अंमलबजावणी केली आणि डॉ. आंबेडकरांनी संविधानाद्वारे समानतेचा अधिकार दिला. आजच्या अन्यायाविरुद्ध लढताना हाच विचार आपल्या मार्गदर्शक दीपस्तंभ आहे,” असे ते म्हणाले.यानंतर बहुजन संघटक पी. डी. सरवदे यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांचा आढावा घेतला. “सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रगती, आर्थिक उन्नती या आधारस्तंभांवर संघटनेची बांधणी झाली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण आणि वंचित घटकांची उन्नती यासाठी ही संघटना सदैव सक्रिय राहील. गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत जाळे निर्माण करून बहुजनांना एकत्र आणणे हे आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

या उपस्थित सर्वांचे स्वागत संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोगोलीकर यांनी केले.सदर बैठकीत सरपंच अनंत कांबळे, राजू कांबळे, सुधीर कांबळे, सहदेव कांबळे, दीपक आडकुरकर, महादेव कांबळे, लखन कांबळे, संदीप कांबळे, बबन माने यांनी स्मशानभूमीचा प्रश्न, जातीचा दाखला, शिष्यवृत्तीतील अडचणी, घरकुल योजना, विद्यार्थी व महिला मेळावे, संघटनेची वाटचाल या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मनोगते व्यक्त केली.या मेळाव्यात तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विविध जाती–धर्मातील लोकांनी एकत्र येत संघटनेच्या एकजुटीचा व विस्ताराचा संकल्प केला.विचारपीठावर भिकाजीराव कांबळे भोगोलिकर, गंगाराम शिंदे, सखाराम कांबळे, संदीप यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन पांडुरंग कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दीपक माने यांनी केले.


अध्यक्षीय भाषणात शाहीर मधुकर कांबळे यांनी चंदगड तालुक्यातील परिवर्तन चळवळीचा आढावा घेतला व बहुजन समाजाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण करून दिली. “फुले–शाहू–आंबेडकर विचारधारा हीच खरी दिशा आहे. संघटितपणे लढल्याशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही,” असे प्रभावी मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा व भारतीय संविधान प्रमाण मानून एकनिष्ठपणे संघटनेचे काम करण्याची शपथ घेण्यात आली. 

हा मेळावा केवळ यशस्वीच नव्हे तर अतिशय भारदस्त ठरला असून, यामधून तालुक्यातील असंख्य बहुजन समाजातील कार्यकर्ते संघटनेशी जोडले गेले आहेत. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी हा मेळावा एक ऐतिहासिक टप्पा ठरला, असा सर्वांचा एकमताने निष्कर्ष निघाला.

Post a Comment

0 Comments