(वंचित समाजाच्या हक्कांसाठी नवा लढा सुरू करण्याचा निर्धार)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील वंचित, शोषित,दलित व बहुजन समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी बहुजन क्रांती संघटनेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे यांनी भूषविले.या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या आधारे समाजातील विद्यमान समस्यांवर चिंतन झाले. शिक्षणातील असमानता, बेरोजगारी, शेतकरी–मजुरांचे प्रश्न, जातीभेद, महिला व मुलींचे प्रश्न, अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक न्याय यांसारख्या संवेदनशील मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत भारतीय संविधानाच्या मूल्यांची गरज अधोरेखित करण्यात आली. समानता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या तत्त्वांशिवाय खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तन शक्य नाही, हे स्पष्ट करण्यात आले. संविधानच वंचित–शोषित समाजाच्या हक्कांचे खरे रक्षणकर्ते असल्याचे मत मांडण्यात आले.डॉ.गुंडूराव कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, “फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी परंपरेतून प्रेरणा घेऊन आणि संविधानिक मूल्यांचा अंगीकार करूनच वंचित, शोषित व बहुजन समाजाच्या हक्कांसाठी नवा लढा उभारता येईल. संघटित चळवळ हीच सामाजिक न्याय आणि समतेची खरी हमी आहे.”
या बैठकीत बहुजन क्रांती संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते भिकाजी कांबळे, पी. डी. सरवदे, गंगाराम शिंदे, परसराम कांबळे, पांडुरंग कांबळे, सरपंच अनंत कांबळे, राजू कांबळे व लखन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.बैठकीच्या शेवटी कार्यकर्त्यांनी सामाजिक ऐक्य, संविधान रक्षण व वंचित समाजाच्या प्रश्नांवर ठोस कृती आराखडा तयार करण्याचा निर्धार केला. या बैठकीतून तालुक्यातील सामाजिक परिवर्तनाच्या नव्या लढ्याची सुरुवात झाल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.प्रमुख कार्यकर्ते भिकाजी कांबळे यांनी सांगितले की “वंचित समाजाच्या प्रश्नांना संविधानाच्या मार्गाने न्याय मिळवून देणे ही काळाची गरज आहे.”पी. डी. सरवदे यांनी नमूद केले की “शिक्षण व संघटन हीच खरी ताकद आहे. समाजकारण हे विचारांवर आधारित असले पाहिजे.”
गंगाराम शिंदे यांनी मत व्यक्त केले की “संविधान वाचवा म्हणजे समाज वाचेल. परिवर्तनासाठी संघटित लढा आवश्यक आहे.”तर सरपंच अनंत कांबळे यांनी ठामपणे सांगितले की “बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कायम लढत राहू.” उपस्थित सर्वांचे आभार भिकाजी कांबळे यांनी मानले. या महत्त्वपूर्ण बैठकीला हणमंत कांबळे, शिवाजी नाईक, शाहीर मधुकर कांबळे, सागर कांबळे, पांडुरंग कांबळे, लखन कांबळे, संदीप यादव, योगेश कांबळे,मयूर कांबळे,राहुल कांबळे,दीपक अडकुरकर, गजानन कांबळे प्रदीप कांबळे लहू शिंदे, पांडुरंग कांबळे यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments