Type Here to Get Search Results !

ऍड.संतोष मळवीकर यांच्या हद्दपारीस उच्च न्यायालयाकडून स्थगिती


चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील वकील संतोष मळवीकर यांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज यांनी बजावलेल्या हद्दपारी नोटीसीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अंतरिम स्थगिती दिली आहे.उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर आज न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या समोर सुनावणी झाली.


संतोष मळवीकर हे पेशाने वकील असून त्यांनी विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे २०१२ पासून त्यांच्यावर ६ ते ७ गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानुसार १८ ऑगस्ट २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार का करू नये यासाठी मळवीकर यांना स्पष्टीकरण मागविण्यात आले होते.



यावर ऍड धैर्यशील सुतार यांच्या मार्फत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की,ऍड संतोष मळवीकर हे वकील असून सामाजिक आंदोलनांमुळे त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे जुने व सामाजिक स्वरूपाचे आहेत. त्यांचा आणि प्रस्तावित हद्दपारीचा काहीही संबंध नसून, नोटीस ही मनमानी व बेकायदेशीर स्वरूपाची आहे. त्यामुळे या नोटीसीस अंतरिम स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.सरकारी वकिलांनी या विरोधात युक्तिवाद केला. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने हद्दपारीच्या नोटीसीवरील पुढील कार्यवाहीस अंतरिम स्थगिती देत, पुढील सुनावणीपर्यंत तहकूब केली.या प्रकरणात ऍड मळवीकर यांच्यामार्फत ऍड. श्रुती घोडके,ऍड.रक्षिता शिंदे,ऍड.रेश्मा आडनाईक,ऍड.शशांक चव्हाण या वकिलांच्या टीमने काम पहिले.

Post a Comment

0 Comments