चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागाच्या वतीने संख्याशास्त्र विषयातील 'सरकारी नोकरीच्या संधी'या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून आर.एफ.ओ. तुषार गायकवाड उपस्थित होते.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संख्याशास्त्र शाखेतील विविध शासकीय नोकरीच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सांख्यिकी, डेटा अॅनालिटिक्स, बँकिंग, विमा कंपन्या, सरकारी संशोधन संस्था, कराधिकारी व राज्यसेवा परीक्षांमध्ये संख्याशास्त्राचे प्राविण्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी योग्य तयारीसाठी अभ्यासक्रमाचे नियोजन, सराव प्रश्नपत्रिका, ऑनलाइन कोर्सेस, वेळापत्रक तयार करणे आणि मानसिक तयारी करणे गरजेचे आहे.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले, "आज या व्याख्यानात विद्यार्थ्यांना संख्याशास्त्र विषयातील शासकीय नोकऱ्यांच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. संख्याशास्त्र ही केवळ आकडेवारीची शाखा नाही, तर भविष्यातील नोकऱ्यांसाठी आणि निर्णयक्षमता सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून मिळालेली माहिती आत्मसात करून आपल्या करिअरमध्ये संधी साधण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे, ही माझी अपेक्षा आहे.”
संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एल.एन गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले.प्रास्ताविक प्रा. प्रियंका निटुरकर यांनी केले, कुमारी अंकिता तराळ सूत्रसंचालन करत होती, तर आभार कुमारी लावण्या राऊत यांनी मानले. यावेळी जेष्ठ प्राध्यापक डॉ. एम. एम. माने यांनी देखील मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून सरकारी नोकऱ्यांसाठी आवश्यक तयारी व कौशल्यांची सखोल माहिती मिळवून आपले भविष्य घडविण्याची संधी प्राप्त केली. या व्याख्यानाला संख्याशास्त्र विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments