कानडी (ता. चंदगड) : बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने कानडी येथील सुप्रसिद्ध गायक श्रीपती कांबळे यांच्या अकस्मित निधनाबद्दल चंदगड येथे शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रमुख व संस्थाअध्यक्ष प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे होते. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनी सांगितले की, श्रीपती कांबळे यांनी आजरा, गडहिंग्लज, चंदगड परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात आपल्या भीमगीतांमधून व शाहिरी पोवाड्यांमधून समाजप्रबोधनाची अविस्मरणीय सेवा केली. बहुजन संघटक पी. डी. सरवदे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, श्रीपती कांबळे यांनी अत्यंत गरिबीत आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहणे ही खरी श्रद्धांजली ठरेल. असे सांगून त्यांनी गायक श्रीपती कांबळे यांच्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्याचा आढावा घेऊन त्यांचे योगदान विशद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे म्हणाले की, गायक श्रीपती कांबळे यांचे आयुष्य साधेपणात गेले असले तरी त्यांनी आपल्या आवाजातून समाजमन जागवले. त्यांच्या भीमगीतांमधून आणि शाहिरी पोवाड्यांमधून वंचित समाजाला दिशा दिली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे गीत प्रत्येकाच्या अंत:करणात कायम घुमत राहील. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा व सांस्कृतिक चळवळ पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे.कोरज- कुरतनवाडी -गंधर्वगडचे सरपंच अनंत कांबळे यांनी सांगितले की, श्रीपती कांबळे यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून गावोगावी विचार पोहोचवला. साध्या राहणीमानात राहूनही त्यांनी समाजासाठी अहोरात्र काम केले. त्यांच्या निधनाने भागात शोककळा पसरली आहे.
शोकसभेचे प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोगोलिकर यांनी केले. त्यांनी म्हटले की, श्रीपती कांबळे हे केवळ गायक नव्हते तर समाजप्रबोधनाचे हृदय होते. त्यांच्या गीतांनी विचारांची ज्योत पेटवली. त्यांच्या अपूर्ण स्वप्नपूर्तीसाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. आभार प्रदर्शन पत्रकार संदीप कांबळे यांनी मानले.
या शोकसभेला सरपंच जयसिंग कांबळे, गंगाराम शिंदे सखाराम कांबळे बबन माने अजित शिरशेट्टी संदीप यादव. सिताराम शिंदे, संतोष यादव रमेश सुतार.अनंत कांबळे, संतोष कांबळे, ओंकार कांबळे, विलास कांबळे, राजेश कांबळे, पत्रकार संदीप कांबळे, पांडुरंग कांबळे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments