Type Here to Get Search Results !

हिंदी ही रोजगार व एआय तंत्रज्ञानासाठी नवनवीन दारे उघडणारी भाषा-प्रा.यु.एस.पाटील


चंदगड (प्रतिनिधी): “हिंदी भाषा ही केवळ राष्ट्रभाषा नाही तर रोजगार, स्पर्धा परीक्षा, पत्रकारिता, साहित्य, संशोधन आणि एआय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण करणारी भाषा आहे. विद्यार्थी जर हिंदीचे सखोल ज्ञान आत्मसात करून आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले गेले, तर त्यांना जागतिक स्तरावरही यशस्वी होता येईल,” असे मार्गदर्शन हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी केले. र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिन सप्ताह व ‘मधुशाला’ भित्तिपत्रकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


आपल्या भाषणात प्रा. पाटील यांनी सांगितले की, आजच्या डिजिटल युगात एआय तंत्रज्ञान वेगाने पुढे सरकत आहे. मातृभाषा म्हणून मराठी आलीच पाहिजेत त्याचबरोबर इंग्रजीसोबत हिंदीचे ज्ञान घेतल्यास विद्यार्थी करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात मागे पडणार नाहीत. हिंदीचे महत्त्व प्रशासन, खासगी कंपन्या, माध्यम संस्था, चित्रपटसृष्टी, दूरदर्शन, रेडिओ, अनुवाद आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन या सर्व क्षेत्रांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. भाषा ही केवळ संवादाचे साधन न राहता रोजगार आणि संशोधनाचे दार उघडते. ज्ञान, भाषा आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा विद्यार्थीच भविष्यात जागतिक पातळीवर यश संपादन करेल, असेही ते म्हणाले.


अध्यक्षस्थानावरून प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धांच्या माध्यमातून आपली कलात्मक व बौद्धिक क्षमता विकसित करून व्यक्तिमत्त्व घडवावे, हिंदी ही देशातील दोन नंबरची भाषा असल्याने  हिंदी दिन सप्ताहासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती देणारे आहेत असे सांगितले. प्रास्ताविक करताना हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सामान्य ज्ञान, निबंध लेखन, हस्ताक्षर लेखन व काव्यवाचन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अभिमानास्पद असल्याचे नमूद केले.


या कार्यक्रमात सानिका नाईक, नूरसभा नेसरीकर व सुशांत केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांचा गौरव प्रा. यु. एस. पाटील व डॉ. गोरल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा माळी यांनी केले तर आभार डॉ. आर. ए. कमलाकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. एन. के. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एस. सावंत, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. ए. डी. कांबळे, अभिषेक प्रल्हाद  कांबळे  यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments