चंदगड : चंदगड तालुक्यातील कानडी येथील शिव,फुले,शाहू,आंबेडकर चळवळीचा पाईक व चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध गायक श्रीपती कांबळे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबात जन्मलेला श्रीपती मुळातच हुशार होता. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उदरनिर्वाहासाठी बॅन्जो पार्टीत गायकाचे काम करत असे. पुढे शिव, फुले,शाहू, आंबेडकर यांच्यावरील पोवाडे तसेच सामाजिक,कौटुंबिक विषयावर स्वरचित गाणी म्हणून तालुक्यातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा गायक श्रीपती कांबळे आज काळाच्या पडद्याआड गेल्याने तालुक्यातील सामाजिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
श्रीपती कांबळे यांच्या मागे मोठा मुलगा तेजस (वय-२० वर्षे), लहान मुलगा साहिल (वय- १५ वर्षे) व पत्नी असा परिवार असून दोन्ही मुले लहानपणापासूनच विकलांग आहेत.ती कायम अंथरुणावरच झोपून असतात तर पत्नीची देखील प्रकृती अधून मधून बिघडत असल्याने श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबाला आधार देणे आवश्यक असल्याने समाजातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी मानून सहकार्य करावे तसेच शासनाने देखील श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाची पाहणी करून सर्वतोपरी मदत करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
Post a Comment
0 Comments