रामपूर (प्रतिनिधी) : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,रामपूर यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रमांतून जनसेवेचा उत्तम आदर्श घालून दिला जातो. याच परंपरेत यंदा २१ व्या गौरवशाली वर्षानिमित्त मोफत सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल गडहिंग्लज यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी मराठी विद्यामंदिर, रामपूर येथे भरलेल्या या शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ११५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरात विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मार्गदर्शन केले.
डॉ. अमोल जाधव,डॉ. निलेश राजमाने,डॉ. अनिल चंदनशिवे,डॉ. किरण गोरुळे तसेच श्री. स्वप्निल पाटील (फार्मासिस्ट), पूजा कांबळे (सिस्टर) व अनिल सालुंखे (मदतनीस) यांनी रुग्णसेवेत मोलाची कामगिरी बजावली.शिबिरात ईसीजी, शुगर, बी.पी. तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, तसेच सामान्य आरोग्य तपासण्या करून आजारांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. अनेक रुग्णांना तात्काळ औषधोपचाराची सोयही उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना शहरात जाऊन तपासणी करणे अवघड ठरते. मात्र या शिबिरामुळे गावकऱ्यांना घराजवळच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सहज मिळाली.गणेशोत्सव मंडळ हे केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमापुरते सीमित न राहता सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रात वर्षभर मंडळाकडून विविध उपक्रम राबवले जातात. आरोग्य शिबिर हा त्याच परंपरेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.शिबिराला उपस्थित रुग्ण व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “आजच्या काळात वाढत्या आजारांमुळे आरोग्य तपासणी गरजेची ठरते. असे मोफत शिबिर म्हणजे गावकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

Post a Comment
0 Comments