चंदगड (प्रतिनिधी): जिल्हा कार्यक्षेत्र असलेली अभय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित, कोवाड ही चंदगड तालुक्यातील अग्रगण्य संस्था असून गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील गरजूंसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरली आहे. कोरोनाच्या कालखंडात संस्थेच्या आर्थिक व्यवहारात थोडी शिथिलता आली होती आणि संस्था अवसायनाच्या मार्गावर होती. मात्र, चेअरमन उत्तम महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या संचालक मंडळाने कार्यभार सांभाळताच संस्थेने पुन्हा उभारी घेतली आहे.
संस्थेच्या कर्ज वितरण, ठेवी, पिग्मी आणि वसुली कामकाजामध्ये भरीव प्रगती झाली असून सभासदांचा विश्वास पुन्हा संस्थेवर बसू लागला आहे.याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.३) सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आणि तालुका सहनिबंधक सुजय येजरे यांनी अभय पतसंस्थेला प्रेरणादायी भेट दिली. त्यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आणि कौतुकाची थाप दिली. भविष्यात संस्थेने नव्या योजना कशा राबवाव्यात, याविषयी त्यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छाही दिल्या.
या प्रसंगी चेअरमन उत्तम पाटील यांचा "मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडरत्न पुरस्कार" मिळाल्याबद्दल आणि व्हाईस चेअरमन लक्ष्मण बागीलगेकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल डॉ. कदम यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास संस्थेचे संचालक अमृत डुरे, लक्ष्मण ओऊळकर, अशोक चव्हाण, वसंत वांद्रे, मॅनेजर शंकर पाटील, शिवाजी हुडेकर, प्रशांत देवण, राजू किणेकर, नागनाथ पाटील, महेश पवार, भाग्यश्री पवार आणि निंगाप्पा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments