(खड्याचे साम्राज्य, प्रशासन सुस्त,तालुक्यातील प्रवाशाना नाहक त्रास)
चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील बेलगाव-वेंगुर्ली रस्ता (शिनोळी ते कानुर) या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील दुरवस्था व खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागण्या करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंदगड तालुक्याच्या वतीने "खड्डे महोत्सव" आयोजित करण्यात आला आहे.
हा महोत्सव 13 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तीन दिवस विविध आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांसह रंगणार आहे.शनिवार, 13 सप्टेंबर रोजी "खड्डा सजावट स्पर्धा" होणार असून विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.रविवार, 14 सप्टेंबर रोजी "खड्डेमय रस्त्यावर धावणे" ही उपहासात्मक धावण्याची स्पर्धा पार पडणार आहे.सोमवार, 15 सप्टेंबर रोजी "भाषण स्पर्धा" आयोजित केली असून विषय – खड्डे बोलू लागले तर, आम्ही खड्ड्यांच्या रस्त्यावरील प्रवासी, तसेच मी कै. शिवाजंली शहापूरकर बोलतेय – असे उपरोधिक व समाजमन हेलावणारे ठेवले आहेत.
या महोत्सवाच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील जनतेचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न होत आहे. हजारो वाहनधारक, प्रवासी व शेतकरी दररोज या रस्त्याने प्रवास करत असून खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.या संयोजनाची धुरा प्रा. दीपक पाटील (जिल्हा उपाध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी स्वीकारली असून विविध गावांतील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
एकूणच, रस्त्यावरील दुरवस्था लोकांसाठी संकट ठरत असताना, "खड्डे महोत्सव" हा आंदोलनाचा वेगळा आणि उपरोधिक पद्धतीने होणारा जनजागृती कार्यक्रम ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments