Type Here to Get Search Results !

चंदगड तहसील कार्यालयात सेवा पंधरवड्याला सुरुवात


(महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी उपक्रमाचा प्रारंभ,नागरिकांसाठी तत्काळ सेवा-सातबारा, जात व उत्पन्न दाखल्यांचे वितरण,विविध शिबिरे व जनजागृती कार्यक्रम)


२ ऑक्टोबरला समारोप – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून गांधी जयंतीपर्यंत राज्यभर उपक्रम राबवला जाणार.


चंदगड : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाला बुधवारी चंदगड तहसील कार्यालयात सुरुवात झाली.या उद्घाटनप्रसंगी लक्ष्मीमुक्ती योजनेतील सामर्थ्य लाभार्थ्यांना सातबारा, जात दाखले व उत्पन्न दाखले तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.


हा विशेष उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजेच १७ सप्टेंबरपासून महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबरपर्यंत राज्यभर राबवला जाणार आहे. या कालावधीत महसूल विभागाचे नियमित कार्यक्रम मोहीम स्वरूपात व युद्धपातळीवर पार पाडले जाणार असल्याची माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली.


सेवा पंधरवड्यात तीन टप्प्यांत उपक्रम राबवले जाणार असून यामध्ये –


पाणंद रस्ते विषयक मोहीम – ग्रामशिवार फेरी, रस्त्यांची यादी तयार करणे व ग्रामसभेत मंजुरी.


योजनांची प्रभावी अंमलबजावणी – अतिक्रमणावरील सुनावणी व निष्कासन, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण, भूअभिलेख विभागाकडून रस्त्यांचे सिमांकन व नकाशातील नोंदी अद्ययावत करणे.


नाविन्यपूर्ण उपक्रम – फेरफार अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निकाल, मटक्या व विमुक्त जातींसाठी विशेष शिबिरे, प्लॅस्टिकमुक्ती निबंध स्पर्धा व पथनाट्य, माहिती अधिकार व सेवा हमी कायद्याबाबत जनजागृती, तसेच आपते सरकार सेवा केंद्र व तलाठी कार्यालयांचे लोकेशन गुगल नकाशावर निश्चित करणे.



या उपक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यात ग्रामपंचायत प्रतिनिधी, महसूल अधिकारी, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments