वारसा नोंद थांबल्याने शेतकरी पीककर्ज व योजनांपासून वंचित ; आक्रोश वाढला!
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांची एकजूट; “हक्क मिळेपर्यंत लढा सुरू राहील”
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील देवरवाडी गावातील देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांचा आक्रोश आज तहसीलदार कार्यालयासमोर उसळला.अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमले व जमिनीच्या मालकी हक्कासाठी घोषणाबाजी करत धरणे आंदोलन छेडले.सुमारे ६५९ हेक्टर जमिनीपैकी तब्बल ९०% जमीन कागदोपत्री ‘श्री वैजनाथ देव इनामदार’ या नावावर आहे. प्रत्यक्षात मात्र गावातील शेतकरी पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या या जमिनीवर त्यांचेच आयुष्य अवलंबून आहे. पण वारस नोंदी थांबल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज, विमा, शासकीय योजना व नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई यापासून वंचित राहावे लागत आहे.
या आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर नऊ ठोस मागण्या ठेवल्या आहेत. त्यात –
👉 वारसा नोंदी तातडीने करणे,
👉 सातबाऱ्यावर शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करणे,
👉 सरसकट खंडपट्टी घेऊन मालकी हक्क देणे,
👉 कबलायतीच्या जाचक अटी रद्द करणे,
👉 पी एम किसानसह सर्व शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे,
👉 देवस्थान समित्यांच्या मनमानीला आळा घालणे या प्रमुख मागण्या आहेत.
आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज वेदना होत्या, पण त्याचबरोबर हक्कासाठी लढण्याची जिद्द आणि प्रेरणा होती. “घाम आमचा, कष्ट आमचे – जमीनही आमचीच असली पाहिजे” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.या निवेदनावर खालील प्रमुख शेतकरी व कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दिला-
कॉ.ऍड अमोल नाईक, कॉ. संग्राम सावंत,ऍड.दशरथ दळवी,कॉ. शिवाजी गुरव (उपसरपंच गोविंद आडाव),शिवश्री संदीप भोगण, प्रा. नागेश जाधव, अमृत भोगण, विजय भांदुर्गे, उमेश भोगण, संघर्ष प्रज्ञावंत, प्रकाश करडे, शंकर मजुकर, गोपाळ भोगण, महादेव केसरकर, दीपक केसरकर, संभाजी केसरकर, दशरथ भोगण, श्री. शंकर के. भोगण, पुंडलिक खे. सुतार, वैजनाथ कृ. भोगण, लक्ष्मण पं. भोगण, थि. शं. भोगण वैजनाथ, गोपाळ मो. आडाव, विनोद गा. मजूर, संदीप दादासो सावंत, सतवा मोरे, ना.पा. पाटील आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने इशारा दिला – “जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन फक्त तहसीलदार कार्यालयापुरते मर्यादित राहणार नाही, तर जिल्हाभर उग्र होईल.” देवरवाडीतील हे आंदोलन आज केवळ जमीन मालकीसाठीचा लढा नाही, तर शेतकऱ्यांच्या सन्मान, अस्तित्व आणि हक्कासाठीची हाक ठरले आहे.
Post a Comment
0 Comments