आजरा/प्रतिनिधी : “स्वच्छता ही सेवा 2025” अंतर्गत सोहाळे ग्रामपंचायतीचा “एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रम उत्साहात पार पडला.गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांची प्रमुख उपस्थिती लावली.गाव स्वच्छ, निरोगी व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य, शाळकरी विद्यार्थी, महिला बचतगट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या मोहिमेअंतर्गत सकाळपासून गावातील प्रमुख रस्ते, शाळा व अंगणवाडी परिसर, देवस्थान, स्मशान शेड, बसथांबा आदी ठिकाणी एकत्रितपणे स्वच्छता करण्यात आली. गावातील प्रत्येक नागरिकाने घरासमोरील व सार्वजनिक ठिकाणचा कचरा गोळा करून स्वच्छतेस हातभार लावला. विद्यार्थ्यांनी “स्वच्छ गाव – सुंदर गाव”, “स्वच्छता हीच सेवा” अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले.
यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी सांगितले की, “गावाच्या प्रगतीसाठी स्वच्छता ही पहिली पायरी आहे. एक दिवस, एक तास गावासाठी दिला तर आपले गाव केवळ स्वच्छच नव्हे तर आरोग्यदायी व आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल. सर्वांनी मिळूनच हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो.”
सरपंच भारती डेळेकर यांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले.त्याचबरोबर या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या पुढेही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता दैनंदिन सवय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी व्यक्त केले.या उपक्रमामुळे गावातील सामाजिक एकोपा बळकट झाला असून, नागरिकांनी “आपले गाव – आपली जबाबदारी” या भावनेने स्वच्छतेचे व्रत हाती घेण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी श्री.नाईक उप अभियंता बांधकाम,बसवराज गुरव,गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी श्री. कुंभार,विलास पाटील,पंचायत समिती कडील सर्व अधिकारी कर्मचारी,ग्रामपंचायत अधिकारी,श्री.रणदिवे,सर्जेराव घाटगे,कुंडलिक शिर्सेकर त्याचबरोबर आजरा महाविद्यालय व व्यंकटराव ज्यु. कॉलेज कडील NSS व NCC विदयार्थी, विद्यामंदिर सोहाळे शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, ग्रा.प उप सरपंच वसंत कोंडुसकर व ग्रामपंचायत सर्व सदस्य,कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस,आशा सेविका,पोलीसपाटील,गावातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, युवा मंडळे,महिला बचत गट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments