चंदगड (प्रतिनिधी) : “चंदगड तालुक्यातील सर्व चर्मकार बांधवांनी बहुजन क्रांती सामाजिक संघटनेत सक्रिय सहभागी व्हावे, कारण संघटनाच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहे. विखुरलेपणामुळे आपण मागे पडलो आहोत, आता एकजूट करून समाजाचा आत्मसन्मान व हक्क जगासमोर अभिमानाने मांडण्याची वेळ आली आहे,” असे प्रेरणादायी आवाहन चर्मकार समाजाचे नेते गंगाराम शिंदे यांनी केले.
बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच हलकर्णी येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे नेते बबन माने होते. त्यांनी सांगितले की, “संघटित झाल्याशिवाय समाजाच्या समस्यांवर ठोस लढा देता येणार नाही. प्रत्येक बांधवाने संघटनेत आपले योगदान दिले पाहिजे.”
गंगाराम शिंदे यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, “गावोगावी शाखा स्थापन करून तरुण, महिला आणि ज्येष्ठांचा समन्वय साधल्यास समाजाला कोणीही थांबवू शकणार नाही. संविधानाने दिलेले हक्क फक्त कागदावर न राहता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संघटना ताकदीने उभी आहे. संघटना ही आशेचा किरण आणि संघर्षाची मशाल आहे.”
प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोगोलिकर यांनी केले तर सूत्रसंचालन पांडुरंग कांबळे यांनी केले. आभार चंद्रकांत कांबळे यांनी मानले.या बैठकीस सिताराम शिंदे, दीपक आडकुरकर, परशराम कांबळे, संतोष यादव कानूर,महादेव यमेटकर, शिवाजी नाईक, भोगोली गावचे डेप्युटी सरपंच जयसिंग कांबळे, संतोष कांबळे, माजी सरपंच एकनाथ पाटील, सिद्धप्पा कांबळे यांच्यासह तालुक्यातील बहुजन समाजातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
👉 या बैठकीतून संघटनेला नवे बळ मिळाले असून, विस्तार आणि एकजुटीवर भर देत समाजाच्या प्रश्नांवर ठोस लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
Post a Comment
0 Comments