चंदगड : र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये जागर जाणिवांचा अभियान व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एन. निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांनीनी आपल्या आरोग्याकडे सजगतेने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. हिमोग्लोबिन हे रक्तातील एक महत्त्वाचे द्रव्य असून त्याच्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा, थकवा, शिक्षणातील कार्यक्षमता कमी होणे असे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. योग्य प्रमाणात पोषणमूल्य असलेला आहार, हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन, तसेच नियमित व्यायाम व जीवनशैलीतील शिस्त यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवता येते. विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास त्यांच्या शैक्षणिक यशात वाढ होईल. महाविद्यालयात असे उपक्रम होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजाणिवा निर्माण होऊन भविष्यातील समाज निरोगी घडण्यास मदत मिळेल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जागर जाणिवांचा विभागाच्या प्रमुख डॉ. (सौ.) आर. के. कमलाकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, “जागर जाणिवांचा अभियान विभाग विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. हिमोग्लोबिन तपासणीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळेल आणि आवश्यक ती काळजी घेता येईल.”
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी नियमित तपासणी करून आरोग्य टिकवून ठेवावे, कारण निरोगी शरीर हेच शिक्षण आणि प्रगतीसाठीची खरी भांडवल असल्याचे सांगितले.सूत्रसंचालन प्रा.मयुरी कांडर यांनी केले.तर प्रा. मोनाली हांडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. पी. एल. भादवणकर, प्रा. एल. एन. गायकवाड, प्रा. एस. एम. पाटील, प्रा. राहुल पाटील, प्रा. नंदकुमार चांदेकर,ऐश्वर्या येळवटकर,शिवराज हासुरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments