Type Here to Get Search Results !

जंगल,प्राणी आणि माणूस हे एकाच जीवनसाखळीचे घटक-सलीम मुल्ला


(अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त सलीम मुल्ला यांचे माडखोलकर महाविद्यालयात  प्रेरणादायी व्याख्यान)


चंदगड (प्रतिनिधी): र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी, कथाकार आणि विचारवंत सलीम मुल्ला यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी “जंगल, प्राणी आणि माणूस : परस्परसंबंध” या विषयावर त्यांनी प्रभावी भाषण करून उपस्थित विद्यार्थ्यांना  मंत्रमुग्ध केले . 


आपल्या भाषणात मुल्ला म्हणाले,“जंगल हे माणसाचे मूळ घर आहे. प्राणी हे आपल्या भावविश्वाचे आरसे आहेत आणि निसर्ग हा आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे. माणसाने निसर्गावर वर्चस्व न गाजवता त्याच्याशी मैत्री केली पाहिजे. जंगलातील प्राण्यांचे अस्तित्व हे मानवी संस्कृतीचे प्रतिबिंब आहे, आणि त्या संतुलनाचे रक्षण करणे हीच खरी मानवी जबाबदारी आहे.”


‘जंगल खजिन्याचा शोध’ या त्यांच्या गाजलेल्या किशोर कादंबरीस सन २०१९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी या कादंबरीतील पात्रांमधून जंगल, आदिवासी जीवनशैली आणि माणसातील निसर्गबंध यांचा अर्थपूर्ण संवाद श्रोत्यांसमोर मांडला.प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले,“मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती विचार, संस्कृती आणि आत्मसन्मानाची भाषा आहे. अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यामागील हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम आणि भाषेचे भान निर्माण करणे. सलीम मुल्ला यांसारखे साहित्यिक तरुण पिढीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. त्यांच्या लेखनातून ग्रामीण संस्कृती, निसर्ग आणि मानवी संवेदना यांचे दर्शन घडते. आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना सृजनशीलतेची नवीन प्रेरणा देईल,” असे त्यांनी सांगितले.पाहुण्यांचा परिचय करून देताना प्रा.डॉ. जी. वाय. कांबळे म्हणाले,“सलीम मुल्ला हे केवळ कवी किंवा कथाकार नाहीत, तर समाजातील प्रत्येक स्तराला विचार करायला प्रवृत्त करणारे लेखक आहेत. त्यांच्या लेखनातून माणसाचा आणि निसर्गाचा अद्भुत संगम दिसून येतो. आज त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक नवा अनुभव ठरेल.”


यावेळी मराठी विभागाने सादर केलेल्या ‘अक्षरगंध’ या भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल व प्रमुख पाहुणे सलीम मुल्ला यांच्या हस्ते झाले.अध्यक्षीय भाषणात डॉ. गोरल म्हणाले,“विद्यार्थ्यांनी सृजनशील लेखनातून मराठी भाषेचा सुवास समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावा. भाषेचा गौरव हा तिच्या जिवंत वापरात आणि सर्जनशीलतेत आहे.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गावडे यांनी मानले.या कार्यक्रमाला हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील,डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. एस. एस. सावंत यांची उपस्थिती लाभली.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून सलीम मुल्ला यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments