Type Here to Get Search Results !

वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच मानवतावादाकडे वाटचाल शक्य-प्रा.मोहित



चंदगड : अंधश्रद्धा निर्मूलन, शास्त्रीय विचारपद्धती, वैज्ञानिक दृष्टीकोन याद्वारे विवेकवाद आणि मानवतावाद या दिशेने वाटचाल केलेस मनुष्यजीवनात प्रगती शक्य आहे. यासाठी माणसाने जुन्या कालबाह्य रूढी परंपरा, दैववाद, कर्मकांड यासारख्या अंधश्रद्धाचां त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.मोहित नंदिनी आनंदा यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजना आणि विवेकवाहिनी विभागामार्फत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. एस. डी. गोरल होते. अंधश्रद्धा निर्मूलन ते विवेकवाद व्हाया वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर ही कार्यशाळा आयोजित केली होती.



शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मार्फत अग्रणी महाविद्यालय ही योजना राबविण्यात येते. यामध्ये अग्रणी समूहातील महाविद्यालये सहभागी होवू शकतात. अशा महाविद्यालयातील प्रत्येकी पाच विद्यार्थी व एक शिक्षक यामध्ये सहभागी होतात. प्रथम या योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. सावंत यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यशाळा आयोजनामागचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. पुष्परोपाला जलार्पण करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. 


यातील पहिल्या सत्रात विवेकवाहिनी विभागाचे प्रमुख प्रा. एम. एस. दिवटे यांनी रूढीपरंपराचीं कालसुसंगत चिकित्सा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. विविध प्रयोग सादर करून त्याद्वारे त्यांनी बुवाबाबांच्या चमत्कार करण्यामधील फोलपणा स्पष्ट करून सांगितला आणि त्यामागील कार्यकारणभाव सिद्ध करून दाखवले. 



दुसऱ्या सत्रात बोलताना प्रा. मोहित पुढे म्हणाले, आपल्या महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. यासर्वांनी आपल्या कीर्तन- प्रवचनातून अंधश्रद्धानां कडाडून विरोध केलेला आहे व अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी द्वेषविरहित आणि प्रेमवर्धित समाजाची कल्पना मांडलेली आहे. त्याच वाटेवरून आपल्याला मार्गक्रमण करावे लागेल तरच आजच्या प्रतिकूल परिस्थितीत आपले निभाव लागेल.अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी नैसर्गिक साधनसंप्पती व पर्यावरण याचे संरक्षण आणि संवर्धनाची अपेक्षा व्यक्त केली. 


हलकर्णी, आजरा, गडहिंग्लज, कोवाड, नेसरी, तुडये येथील महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त करून कार्यशाळा आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एम. एम. माने, प्रा. डॉ. टी. ए. कांबळे यांनीही परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महादेव गावडे यांनी केले. शेवटी प्रा. डॉ. सौ. कमलाकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments