चंदगड (प्रतिनिधी) : एक ऑक्टोबर 1941 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बेळगाव येथे स्थापन केलेली महार रेजिमेंट ही भारतीय सैन्याच्या इतिहासातील आत्मसन्मानाची जाज्वल्य परंपरा आहे. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ सैनिक सुभेदार गेनबा कांबळे यांचा त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
सुभेदार गेनबा कांबळे यांनी तब्बल 28 वर्षे महार रेजिमेंटमध्ये सेवा बजावली. त्यांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेत तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते त्यांना संग्राम पदक, शौर्य पदकासह सात पदके आणि दोन गौरवचिन्हे बहाल करण्यात आली होती. त्यांनी 1965 व 1971 च्या भारत–पाक युद्धात सक्रिय सहभाग नोंदवला होता.
सत्कार प्रसंगी बोलताना सुभेदार कांबळे भावूक होत म्हणाले, “देशासाठी जीवाची बाजी लावून रणांगणावर उभा राहिलो. गोळ्यांचा वर्षाव सहन केला, सहकाऱ्यांना डोळ्यांसमोर गमावले… पण मातृभूमीचा मान कधी झुकू दिला नाही. आज समाज माझ्या या सेवेला मान देत आहे, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षणिका आहे.” त्यांच्या या शब्दांनी वातावरण भारावून गेले.
या सत्कार कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे यांनी या उपक्रमामागची भूमिका आणि संघटनेच्या उद्दिष्टांचा ऊहापोह केला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली महार रेजिमेंट ही केवळ सैनिकी परंपरा नाही, तर आमच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. त्या परंपरेला जिवंत ठेवणाऱ्या वीरांचा समाजाने गौरव करणे ही आपली जबाबदारी आहे. बहुजन क्रांती सामाजिक संघटना ही सैनिकांच्या शौर्याचा आणि समाजाच्या आत्मभानाचा सेतू आहे. सामाजिक समता, शैक्षणिक उन्नती, युवकांना प्रेरणा व देशभक्तीची जाज्वल्य भावना जागवणे ही आमच्या संघटनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सुभेदार गेनबा कांबळे यांचा आज झालेला सत्कार ही त्या उद्दिष्टपूर्तीची प्रेरणादायी पायरी आहे.”
बहुजन संघटक पी. डी. सरवदे यांनी भावना व्यक्त करत सांगितले, “आपल्या समाजातून उभे राहून देशासाठी लढणारे वीर हे आपल्या सर्वांच्या प्रेरणेचे झरे आहेत. सुभेदार गेनबा कांबळे यांच्या शौर्यामुळे भावी पिढ्यांना देशसेवेचे बळ मिळेल.”तर संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोगोलिकर म्हणाले, “सैनिकांचा सन्मान करणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या आत्मसन्मानाचा गौरव होय. आज झालेला सत्कार हा आपल्या संघटनेच्या कार्यातील अभिमानाचा क्षण आहे.”
या कार्यक्रमाला गंगाराम शिंदे.सरपंच अनंत कांबळे, राजू कांबळे, परशराम न्हावेलीकर हनीफ सय्यद टेलर, मोहनराव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता.सुभेदार गेनबा कांबळे यांची कन्या, चंदगड येथील वकील एडवोकेट भारती कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले,की “वडिलांचे आयुष्य हे आमच्यासाठी अभिमानाचा वारसा आहे. आज समाजाने त्यांचा गौरव केला, हा क्षण आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला आहे.” संपूर्ण कार्यक्रमात सुभेदार गेनबा कांबळे यांच्या शौर्याच्या आठवणींनी व भावस्पर्शी भाषणाने वातावरण देशभक्तीच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेले.


Post a Comment
0 Comments