चंदगड (प्रतिनिधी): “आजच्या काळात वाढते प्रदूषण,हवामानातील बदल,पाण्याची कमतरता आणि प्लास्टिकचा अतिरेक या सर्वांचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजेच माणसाचे आरोग्य जपणे होय. म्हणून तरुण पिढीने वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिकमुक्ती व पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली पाहिजे,” असे प्रतिपादन प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. निकम यांनी केले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानावरून प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी सांगितले की, “निरोगी समाज निर्मितीसाठी निरोगी पर्यावरण आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वतःची समजून घेतली पाहिजे.”प्रास्ताविक करताना डॉ. आर. ए. कमलाकर म्हणाल्या की, “पर्यावरण व आरोग्य या दोन्हींचा परस्परसंबंध फार निकटचा आहे. माणूस निसर्गाशी जितका जवळ राहील तितका त्याचा जीवनमानाचा दर्जा उंचावेल. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दरवर्षी असे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे.” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. के. पाटील यांनी केले तर आभार प्रा. आर. व्ही. आजरेकर यांनी मानले.यावेळी प्रा. एम. एस. दिवटे, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. एन. एस. मासाळ, प्रा. आर. एस. पाटील, अभिषेक प्रल्हाद कांबळे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments