चंदगड/प्रतिनिधी : “आई-वडिलांचे ऋण कधीही विसरू नका. स्वतःला ओळखा, आपल्या कुवतीवर विश्वास ठेवा. व्यसनापासून दूर राहा आणि आयुष्य घडविण्यासाठी वाचन संस्कृतीला जपा. यशस्वी होण्यासाठी वाचन हा सर्वात मोठा आधार आहे. ‘लक्षवेध’ सारख्या भित्तीपत्रकातून विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा मिळते तसेच चंदगड तालुक्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा प्रकाशात येतो,” असे प्रतिपादन महसूल अधिकारी महेश धुळाज यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने ‘लक्षवेध’ या भित्तीपत्रकाचे उद्घाटन महसूल अधिकारी धुळाज व प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांच्या हस्ते झाले.प्रास्ताविक करताना इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी विभागात राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी “इतिहास हा समाजाला दिशा देणारा विषय असून विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती, चिकित्सक दृष्टी आणि सामाजिक जबाबदारी अंगीकारली पाहिजे,” असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गोरल यांनी “भित्तीपत्रक हे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच समाजाभिमुख कार्यातही सक्रिय राहावे,” असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमात इतिहास विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तेजस्विनी कांबळे हिचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. रंजना पाटणकर हिने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन त्रिवेणी कांबळे हिने केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विजय गावडे यांनी मानले.
याप्रसंगी डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एस. एस. सावंत, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. ए. वाय. जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments