चंदगड : महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत आणि विकसित राज्य म्हणून ओळखले जाते. या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात सहकार क्षेत्राचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. आजही देशाच्या ग्रामीण विकासाची खरी गुरुकिल्ली सहकारच आहे, असे प्रतिपादन चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी केले. ते अडकूर (ता. चंदगड) येथे नव्याने स्थापन झालेल्या दि बलभीम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अडकूर या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते अभयदादा देसाई होते.
उद्घाटनपर भाषणात माजी आमदार पाटील म्हणाले, “महाराष्ट्राला सहकाराचा समृद्ध वारसा लाभला आहे. लोकनेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, तात्यासाहेब कोरे, शरदचंद्र पवार, सदाशिव मंडलिक आणि माजी आमदार नरसिंगराव पाटील यांसह अनेक दिग्गजांनी त्यांच्या काळात ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून प्रगती घडवली. त्यांच्या योगदानामुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला, अनेक प्रक्रिया उद्योग आणि सहकारी संस्थांचे जाळे उभे राहिले. आजच्या पिढीतील सहकारातील कार्यकर्त्यांनी या वारशाला जोपासणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांचा कारभार सभासदांच्या हितासाठी प्रामाणिक, पारदर्शक व लोकाभिमुख असावा. दि बलभीम पतसंस्थाही याच ध्येयाने भविष्यकाळात कार्य करेल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रा. डॉ. टी. ए. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, “अडकूर आणि परिसरातील शेतकरी, कामगार, महिला व युवक यांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी आणि ग्रामविकासाला गती देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. सहकार हा फक्त आर्थिक व्यवहार नसून सामाजिक बांधिलकी व एकतेचा प्रतीक आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण जीवनमान सुधारण्याचे कार्य अधिक प्रभावीरीत्या साध्य करता येईल. सर्व सदस्यांनी आपापल्या कर्तव्यांमध्ये निष्ठा आणि सहभाग दाखवला पाहिजे, तरच ही संस्था आदर्श बनेल.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते अभयदादा देसाई अडकुरकर होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत दृढ विश्वास व्यक्त केला. “संस्थेच्या स्थापनेमागील सामाजिक उद्देश, सदस्यांची निष्ठा आणि पारदर्शक कारभार पाहता, दि बलभीम पतसंस्था निश्चितच यशाच्या शिखरावर पोहोचेल. ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकारभाव यामुळे ही संस्था पंचक्रोशीतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाईल,” असे त्यांनी नमूद केले.
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने अडकूर येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात दहा लाख रुपये खर्चून पेव्हिंग ब्लॉकसह करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचे लोकार्पणही माजी आमदार पाटील यांच्या हस्ते पार पडले. सोहळ्याचे सूत्रसंचालन दिलीप भेकणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक संजय पाडले यांनी केले.या उद्घाटन सोहळ्यास बलभीम पतसंस्थेचे सर्व संचालक, सल्लागार मंडळाचे सदस्य, सरपंच सचिन गुरव, बबन देसाई, हनुमंतराव देसाई, उपसरपंच उज्वला देसाई, जगन्नाथ इंगवले, संग्राम देसाई, पुंडलिक इंगवले, डॉ. रणधीर देसाई, श्रीमती यशोदा कांबळे तसेच पंचक्रोशीतून आलेले दयानंद पाटील, रामचंद्र दळवी, गोविंद सावंत, सिद्राम पवार, लक्ष्मण कुराडे, बाळू पारसे, रवळू भादवणकर, दीपक गावडे, जयवंत पाटील, प्रवीण गुडवळेकर, रामू गावडे, बाबुराव गुडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, आणि दि बलभीम पतसंस्थाची ग्रामीण विकासात निर्णायक भूमिका बजावण्याची आशा उपस्थितांच्या मनात दृढ झाली.
--
Post a Comment
0 Comments