जागेच्या वादामुळे स्मशानभूमीचे काम ठप्प-मंजूर निधीही वापराविना पडून, पण याला अपवाद वगळता नांदवडे गावाने उभारले आदर्श स्मशानशेड-प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घ्यावा आदर्श!
चंदगड/प्रतिनिधी : खालसा सावर्डेसह हेरे परिसरातील अनेक गावांमध्ये आजही स्मशानशेड नसल्याने अंतिम प्रवास हा अक्षरशः यातनादायी ठरत आहे.गावागावात लोकांना शेता-शिवारातून, चिखल-पावसातून मृतदेह नेऊन विधी पार पाडावे लागतात, ही दुर्दैवी स्थिती आजही कायम आहे.खालसा सावर्डे या गावात पावसाळ्यात अंतिम विधीसाठी शेतांमधून वाट काढावी लागते.गावातील लोकसंख्या जेमतेम पाचशे असून शेता-शिवारातून जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत.उन्हाळ्यात फारशी अडचण भासत नसली तरी पावसाळ्यात पूर, चिखल आणि ओल्या वाटांमुळे अंतिम प्रवास अत्यंत कठीण बनतो.
गावात यापूर्वीही स्मशानशेड संदर्भात अनेक ग्रामसभा, मीटिंग्स झाल्या, पण प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
जागेच्या वादामुळे चर्चा वारंवार फिसकटते, तर काहींनी स्मशानभूमी गावाजवळ नको, अशी भूमिकाही घेतली.
याच कारणामुळे शासनाकडून आलेला लाखोंचा निधी तसाच पडून राहिला असून, आजही गाव स्मशानशेडविना आहे.
गावातील अनेक भूमीहीन कुटुंबांना अंतिम विधीसाठी जागाच नाही, त्यामुळे “उद्या आमचा विधी कुठे होईल?” अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे.ही समस्या केवळ खालसा सावर्डेपुरती मर्यादित नसून, हेरे परिसरातील अनेक गावांना याचा फटका बसतो आहे.दरम्यान, नांदवडे ग्रामपंचायतीने स्मशानशेड उभारून आदर्श निर्माण केला आहे.स्मशान परिसरात शे-दोनशे नारळीची झाडे लावून तेथील वातावरण प्रसन्न केले आहे.या झाडांमुळे भविष्यात ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार असून, स्मशानशेडमध्ये बसण्याची सोय व स्वच्छ व्यवस्था असल्याने अंतिम प्रवास सुखकर ठरतो आहे.
ग्रामस्थांनी शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे की,“स्मशानशेडची समस्या आता नुसत्या कागदावर राहू नये ; गावात ठोस निर्णय घेऊन कायमस्वरूपी उपाय करावा.”
Post a Comment
0 Comments