(पालखी सोहळ्यात आमदार राजेश पाटील यांचा सहभाग; भक्तिरसात रंगली बाळेकुंद्री नगरी,सीमाभाग व कर्नाटकातून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, संतवाणीने दुमदुमले वातावरण)
चंदगड/प्रतिनिधी : श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथे सुरू असलेल्या श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्री पुण्यतिथी यात्रोत्सवात आज भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मा. आमदार राजेश पाटील यांनी पंत भक्त म्हणून उपस्थित राहून श्री पंत महाराजांच्या पालखी सोहळ्यात मनोभावे सहभाग नोंदविला.
सद्गुरूंच्या चरणी नम्र वंदन करून आमदार पाटील यांनी सर्व भक्त, भाविक आणि नागरिकांना पुण्यतिथीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी याप्रसंगी सांगितले की, “पंत महाराजांच्या विचारांनी आणि उपदेशांनी सीमाभागातील समाजात अध्यात्म, सेवा आणि एकात्मतेची भावना दृढ केली आहे.”पालखी सोहळ्यादरम्यान श्री पंत महाराजांच्या नामगजराने संपूर्ण बाळेकुंद्री नगरी दुमदुमून गेली. भजन-कीर्तन, संतवाणी, नामस्मरण आणि दत्तमंडळांच्या कार्यक्रमांनी यात्रास्थळ भक्तिरसात न्हाऊन निघाले.
याप्रसंगी चंदगड तालुक्यातील, सीमाभागातील तसेच कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भक्तांच्या जयजयकाराने आणि ढोल-ताशांच्या गजरात पंत महाराजांची पालखी नगरप्रदक्षिणा घालण्यात आली. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथील ही पुण्यतिथी यात्रा दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. यंदाही या सोहळ्याला विविध धार्मिक, सामाजिक आणि सांप्रदायिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Post a Comment
0 Comments