चंदगड : फुले,शाहू,आंबेडकर यांनी काळाची पाऊले ओळखून देशात शिक्षणाची क्रांती घडवून आणली. या महामानवांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊनच चंदगड तालुक्यात र.भा. माडखोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1953 साली खेडूत शिक्षण मंडळाची स्थापना केली. आज चंदगड तालुक्यातील गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहचवण्याचे काम माडखोलकर यांनी केले आहे. ही ज्योत आजच्या विद्यार्थ्यांनी कायमपणे तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन गडहिंग्लज येथील साधना शिक्षण संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य जे.बी.बारदेस्कर यांनी केले.ते खेडूत शिक्षण संस्थेच्या नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड येथे आयोजित केलेल्या संस्थेचे दिवंगत चेअरमन र.भा.माडखोलकर यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक प्रा.आर.पी.पाटील होते. स्वागत कॉलेजचे प्राचार्य आर.पी.पाटील यांनी केले.तर प्रास्ताविक उपप्राचार्य व्ही.एन.कांबळे यांनी केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माडखोलकर सर यांच्या समाधीला पुष्पअर्पण करून फोटो पूजन करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना जे.बी.बारदेस्कर म्हणाले की, देशाचे भवितव्य शाळेच्या वर्ग खोल्यातूनच घडत असते. शिक्षणातून जीवनाचे परिवर्तन करण्यासाठी शिक्षक अहोरात्र प्रयत्न करत असतात.शाळाच माणसांना घडवत असते याचा विचार करूनच माडखोलकसरांनी तालुक्यात शिक्षणाची सोय केली. खेडूत शिक्षण संस्थेतील सर्वच माणसे पुरोगामी विचारांचा वारसा जपणारी आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा डाव्या विचारसरणीचा असून शेतकरी,कष्टकरी व कामगारांचे राज्य यावे यावे यासाठी प्रयत्न करणारा पक्ष होता. त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून माडखोलकरसरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून बारदेस्कर यांनी सध्या शिक्षणाचा धंदा झाल्याने विद्यार्थी संस्कारापासून लांब जात आहेत. मात्र खेडूत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आजही आपले अस्तित्व टिकवून उंच भरारी घेत आहेत. तेव्हा आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख निर्माण करून समाजाच्या विकासाला ही योगदान द्यावे असे आवाहनही बारदेस्कर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात संचालक प्रा.आर.पी.पाटील म्हणाले की, सध्या खाजगी इंग्रजी शाळांचे पीक वाढल्याने सरकारी शाळांची परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांच्या प्रबोधनाची गरज आहे. रयत शिक्षण संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माडखोलकर सरांनी खेडूत शिक्षण संस्थेची वाटचाली यशस्वी करून दाखवली असून संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम केले असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे संचालक व माजी प्राचार्य डॉ.पी.आर.पाटील, कार्वेचे माजी प्राचार्य एस.व्ही.गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार आनंद सुतार,संचालक एस.एम.फर्नांडिस, र.भा. माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.गोरल, संस्थेचे माजी संचालक ॲड.आर.पी.बांदिवडेकरकर,माजी मुख्याध्यापक डी.के.कदम, प्रकाश चौगुले,शिवाजी लाड,प्रा.एस.एम निळकंठ,अध्यापक व्ही.के.गावडे, प्रा.सलीम शेख,प्रा.अशोक नांदवडेकर, प्रा.दीपक कांबळे, प्रा.व्ही.बी.गावडे,प्रा.धायगुडे प्रा. आर.के.पाटील, ज्ञानेश्वर गायचारे यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अध्यापक संजय साबळे यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.बी.सी.शिंगाडे यांनी मानले.


Post a Comment
0 Comments