(पानंद रस्ते तातडीने खुले न झाल्यास ब्लॅक पॅंथर पक्षाचे आंदोलन,शेतकऱ्यांची शेती पडून तर देवस्कीची कामे ठप्प; प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनेची मागणी)
चंदगड : कोकरे (ता. चंदगड) ग्रामपंचायत हद्दीतील बंद पानंद रस्त्यांमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत आले आहेत. या रस्त्यांना तातडीने खुले करून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ब्लॅक पॅंथर पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात पक्षाच्या प्रतिनिधींकडून तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोकरे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेले पानंद रस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांना शेतीपर्यंत ट्रॅक्टर, औते, शेतीची अवजारे नेणे कठीण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी रस्ता नसल्याने शेती कसणेच बंद केले आहे.
गावालगत असलेले सातेरी नावाचे दहा एकर क्षेत्रफळाचे शेत पानंद रस्ता नसल्यामुळे अनेक वर्षांपासून पडून आहे. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरून गावातील देवस्कीची कामे चालत असत, पण आता तीही ठप्प झाली आहेत. नदीकाठावरील सुपीक शेतीही रस्त्याअभावी नांगरली जात नाही.
विशेष म्हणजे अडूरे ते म्हारकी मार्गे जाणारा पानंद रस्ता अर्धवटच सोडल्याने मागासवर्गीय शेतकऱ्यांना मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे खालील रस्त्यांची तातडीने कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे —
कोकरे–तलाव मार्गे सातेरीशेत ते किरमटेवाडी रस्ता,
कोकरे–तलाव–बांबर मार्गे धरणाकडे जाणारा रस्ता,
गुंडीचामाळ ते अडूरे म्हारकी शेत रस्ता,
कोकरे ते भोगोलीकडे जाणाऱ्या सुभाष देसाई मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण.
या सर्व रस्त्यांच्या दुरुस्ती व सुरूवातीबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, दौलत कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर, माजी सरपंच नारायण किरमटे, तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, विकी कांबळे व परशराम कांबळे आदी उपस्थित होते.
“पानंद रस्ते बंद – शेती ठप्प आणि गावाचा विकास ठप्प! कोकरेतील शेतकऱ्यांचा आवाज आता तहसीलदारांपर्यंत पोहोचला आहे; पण प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर चंदगडमध्ये रस्त्यांसाठी आंदोलनाची ठिणगी पडणार, हे निश्चित.”

Post a Comment
0 Comments