(आ.शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून मदत रवाना; अजूनही मदतीचा ओघ सुरुच)
चंदगड/प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर, बीड, जालना व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. घरांमध्ये पाणी शिरल्याने हजारो नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली, त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचबरोबर पशुधनाचीही हानी झाली. या नैसर्गिक संकटातून या आपल्या बांधवांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी 'एक हात मदतीचा' हे अभियान राबवत चंदगड , गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील जनतेला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला या तीन्हीं तालुक्यातील हजारो नागरिकांनी, व्यापारी व सामाजिक संघटनांनी प्रतिसाद दिला. स्वतःशिवाजी पाटील यांनीही २० टन तांदूळ व पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य दिले आहे. आमदार पाटील यांनी या मदतकार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
आमदार शिवाजी पाटील यांच्या आवाहनानंतर पूरग्रस्तांसाठी आतापर्यंत अन्नधान्याबरोबरच लाखो रुपयांची आर्थिक मदतही मिळाली असून आतापर्यंत २२ टन अन्नधान्य, खाद्य तेल, ब्लॅकेंट, कपडे व बेकरी पदार्थ मदत म्हणून पोहचवण्यात आले आहेत. त्याचबरोबर जमा झालेली सर्व रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री मंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्यात येणार आहे. अजूनही मदतीचा ओघ सुरुच असून जमा झालेली सर्व तातडीने पूरग्रस्तांसाठी पोहचवण्याची सोय आमदार यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अजून जवळपास ३० टनांपर्यंत अन्नधान्य (ज्वारी, तांदूळ, गहु, डाळी), साबण, खाद्यतेल, चादरी, कपडे, तिखट , बिस्किटे यांची मदत पाठवली जाणार आहे. चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील नागरिकांनी सढळ हाताने मदत केल्याबद्दल आ.पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले.
Post a Comment
0 Comments