(हलकर्णी महाविद्यालयात ‘महिलांच्या सबलीकरणाचे आयाम’ या विषयावर अग्रणी कार्यशाळा उत्साहात संपन्न,शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणातूनच महिला घडवतील प्रगत समाज-कार्यशाळेत तज्ज्ञांचे मत)
चंदगड/प्रतिनिधी : “महिलेने फक्त जगायचं नाही, तर जग घडवायचं आहे. समाजात स्त्रीचे स्थान दृढ करणे हा खऱ्या सबलीकरणाचा पाया आहे,” असे प्रतिपादन सौ. शितल विशाल पाटील यांनी हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित ‘महिलांच्या सबलीकरणाचे आयाम’ या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
ही कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व अग्रणी महाविद्यालय अंतर्गत अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शितल पाटील होत्या, तर व्यासपीठावर प्रा. डॉ. संजीवनी पाटील (गडहिंग्लज महाविद्यालय), ग्रंथपाल वंदना केळकर, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर आणि समन्वयक प्रा. डॉ. एन. सी. हिरगोंड उपस्थित होते.कार्यशाळेचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.प्रास्ताविकातून प्राचार्य अजळकर यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.
पहिल्या सत्रात प्रा. डॉ. संजीवनी पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सबलीकरणावर सविस्तर चर्चा केली, तर दुसऱ्या सत्रात वंदना केळकर यांनी आर्थिक सबलीकरण, जेंडर बजेटिंग व तंत्रशास्त्रीय कायदेविषयक बाबींचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यशाळेत चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले.यावेळी उपस्थितांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाहिन मुजावर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सरिता मोटराचे आणि प्रा. डॉ. ज्योती व्हटकर यांनी केले.यावेळी डॉ. राजेश घोरपडे, प्रा. यु. एस. पाटील, डॉ. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. वसंत पाटील, डॉ. जयश्री पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments