Type Here to Get Search Results !

पर्यटन विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची घेतली भेट


(पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सकारात्मक चर्चा – विकासकामांसाठी मंत्र्यांची सकारात्मकता,पर्यटनवाढीस चालना अपेक्षित – नवीन योजना आणि मूलभूत सुविधा उभारणीमुळे स्थानिकांना रोजगार व आर्थिक संधी)



चंदगड/प्रतिनिधी : चंदगड विधानसभा मतदारसंघातील पर्यटन क्षमतेचा विकास साधण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीत चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यांतील पर्यटनस्थळांसाठी आवश्यक विकासकामे आणि सोयीसुविधा उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.


आमदार पाटील यांनी या भागातील पर्यटनाची संधी अधोरेखित करत सांगितले की, “सह्याद्रीच्या निसर्गरम्य घाटमाथ्यांवर, किल्ल्यांवर, धबधब्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर पर्यटनाची मोठी क्षमता आहे. योग्य पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व्यवस्था आणि प्रचार-प्रसार यामुळे या भागातील पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळतील.”


पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत, “चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा भागातील पर्यटन वाढीसाठी शासन पातळीवर लवकरच ठोस पावले उचलली जातील. पर्यटनस्थळांचा विकास हा स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल,” असे आश्वासन दिले.


या भेटीमुळे स्थानिकांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून, योग्य नियोजन आणि वेगवान अंमलबजावणी झाल्यास सह्याद्री परिसरातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाणे राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये गणली जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments