(आमदार शिवाजीराव पाटील यांची पुढाकाराने भेट-रस्त्याच्या दुरुस्तीची तातडीची गरज सार्वजनिक बांधकाम मंत्रींच्या निदर्शनास आणली,तात्काळ दुरुस्तीचे आश्वासन-मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सकारात्मक प्रतिसाद)
चंदगड/प्रतिनिधी : बेळगाव–वेंगुर्ले या महत्त्वाच्या मार्गावरील दयनीय अवस्थेमुळे वाढलेल्या अपघातांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आणि या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी केली.
या मार्गावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन अपघातांचे प्रमाण वाढले असून, निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याने स्थानिकांमध्ये संताप पसरला आहे.
आमदार पाटील यांनी मंत्री भोसले यांना भेटून स्पष्ट केले की, “बेळगाव–वेंगुर्ले हा मार्ग दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. व्यापार, शेतकरी, विद्यार्थ्यांची वाहतूक आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे.”
या मागणीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी आमदार पाटील यांच्या पुढाकाराचे स्वागत करत दुरुस्ती लवकर सुरू होऊन अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि प्रवास सुलभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Post a Comment
0 Comments