Type Here to Get Search Results !

चंदगड महाविद्यालयात भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित लोककला गोंधळ कार्यक्रम;विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर आधारित लोकसंस्कृतीतील मराठी लोककला गोंधळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल उपस्थित होते.


उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. गोरल यांनी सांगितले की, "लोककला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ती आपली सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख उलगडते. गोंधळ आणि लावणी सारख्या पारंपरिक कलांनी विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव वाढते आणि इतिहासाशी स्नेह निर्माण होतो. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभेला वाव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. महाविद्यालयाच्या स्तरावर अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरून विद्यार्थी आपल्या परंपरेशी जोडलेले राहतील आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरतील."


कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. चंदगड येथील प्रसिद्ध गोंधळी कलाकार धोंडीबा गोंधळी यांनी गोंधळ कलाप्रकाराबाबत माहिती दिली. त्यांनी गोंधळ गीताचे विविध प्रकार जसे की लावणीगोंधळ, पंढरगोंधळ, शेवगोंधळ यांचा परिचय करून दिला आणि त्या शैलीत गोंधळी गीत सादर केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मन जिंकले.महाराष्ट्राच्या लोककलेचा आत्मा मानली जाणारी लावणी सादर करण्यासाठी बीकॉम भाग दोनचा विद्यार्थी जय देसाई यांनी ढोलकीवर जोशपूर्ण तोडा सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.या कार्यक्रमादरम्यान बी. ए दोनच्या विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक भूमिका सादर करून इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींना उजाळा दिला. कुमारी त्रिवेणी कांबळे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, अस्मिता मासरणकर यांनी महाराणी येसूबाई, तर निशिगंधा कदम यांनी भद्रकाली ताराराणी यांची भूमिका प्रभावीपणे सादर केली.


कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मोदी लिपी तज्ञ डॉ. बी. जी. गावडे यांनी केले. यावेळी प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ.आर. ए. कमलाकर आणि डॉ. जी. वाय. कांबळे उपस्थित होते.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक व संशोधनात्मक जाणिवेला चालना देणारा ठरला. गोंधळ आणि लावणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची ओळख करून घेतली आणि प्रेक्षकांना आनंदाने भारवले.

Post a Comment

0 Comments