Type Here to Get Search Results !

सीमाकवी रवींद्र पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


पुणे (प्रतिनिधी ) : पुणे येथील छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात सीमाकवी रवींद्र पाटील यांना  ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.पुणे मराठी साहित्य,संस्कृती आणि संभाजी महाराजांच्या प्रेरणेतून तेज फुलविणाऱ्या '१७ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागातील  सीमाकवी, पत्रकार आणि उपक्रमशील शिक्षक रवींद्र पाटील यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” संमेलनाचे उद्घाटक डॉ. शरद गोरे यांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.


पुणे येथे रविवार 5 ऑक्टोबर रोजी क्रांतिसूर्य महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी - पुणे येथे पार पडलेल्या या भव्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. शरद गोरे यांच्याहस्ते झाले.यावेळी रवींद्र पाटील यांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक संतोष नारायणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, नवोदित साहित्यिकांच्या वाटचालीचा आणि संभाजी महाराजांच्या निर्भय विचारांचा उल्लेख करीत प्रेरणादायी संदेश दिला.


याप्रसंगी स्वागताध्यक्ष विजया गायकवाड, पुणे विभाग अध्यक्ष सुर्यकांत नामुगडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगाळे, तसेच साहित्यिक किशोर टिळेकर यांची मान्यवर उपस्थिती लाभली.सुत्रसंचालनाची जबाबदारी अमोल कुंभार यांनी अत्यंत प्रभावी, रसाळ आणि ओजस्वी शब्दांत पार पाडली.


या संमेलनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील २०० हून अधिक कवींनी सहभाग नोंदवून मराठी कवितेचा सोहळा रंगविला.कवितांमधून मराठी मातीतला सुगंध, सीमाभागाचा अभिमान, आणि संभाजींच्या पराक्रमाचा नाद सभागृहात दरवळला.या सन्मानाने सीमाभूमीतील शिक्षक आणि कवी समाजाचा आत्मसन्मान उंचावला असून, मराठी शब्दसंपदेच्या या उत्सवात रवींद्र पाटील यांनी आपला ठसा उमटविला आहे.

Post a Comment

0 Comments