(विजय तारळी आणि आदित्य खवरे यांच्या प्रामाणिकपणाचे गडहिंग्लज पोलिसांनी केले कौतुक,रकमेचा खरा मालक पुढे येऊन ओळख पटवून रक्कम घेण्याचे आवाहन,गडहिंग्लजमध्ये दोन तरुणांनी 12 हजार रुपये पोलिसांकडे जमा)
गडहिंग्लज : मानवतेला आणि प्रामाणिकपणाला उजाळा देणारी घटना गडहिंग्लज शहरात घडली आहे. हिंदवी चौकात सापडलेले तब्बल 12 हजार रुपये दोन तरुणांनी कुठलीही लालसा न ठेवता थेट गडहिंग्लज पोलिस ठाण्यात जमा केले.
12 नोव्हेंबर रोजी,सायंकाळी सुमारे 07 वाजता विजय चंद्रशेखर तारळी (रा. चंदगड) आणि आदित्य जयवंत खवरे (वय 19, रा. सुळगाव, ता. आजरा) या दोघांना हिंदवी चौकात 12,000 रुपयांची रोख रक्कम सापडली. त्यांनी ती रक्कम स्वतःकडे न ठेवता प्रामाणिकतेचा आदर्श ठेवत तत्काळ गडहिंग्लज पोलिस ठाण्यात आणून जमा केली.या प्रामाणिक कृत्याबद्दल गडहिंग्लज पोलिस निरीक्षकांनी या दोन्ही तरुणांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. पोलिसांनी सांगितले की,
> “या दोघांनी दाखवलेला प्रामाणिकपणा समाजासाठी प्रेरणादायी आहे. आजच्या काळात अशा तरुणांची गरज आहे.”
दरम्यान, गडहिंग्लज पोलिस ठाण्याकडून कळविण्यात आले आहे की ही रक्कम ज्यांची हरवली आहे त्यांनी ओळख पटवून पोलीस ठाण्यातून ताब्यात घ्यावी.
या घटनेमुळे गडहिंग्लज परिसरात या दोन्ही तरुणांच्या प्रामाणिकतेचे कौतुक होत आहे.जनतेतून या दोघांचे अभिनंदन करत, “अशीच माणुसकी आणि प्रामाणिकता समाजाला पुढे नेणारी असते,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments