Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना किमान 3600 रु हप्ता द्या-आमदार शिवाजीराव पाटील


अतिवृष्टी व जंगली जनावरांमुळे ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान-3600 रु. दराची शेतकऱ्यांची मागणी

(कार्वे येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आमदार शिवाजी पाटील यांचे आश्वासन)

प्रत्येक कारखान्यावर शासनमान्य काटा बसवण्याचा निर्णय; ऊस दर वाढवण्यासाठी सर्व कारखानदारांशी तातडीने चर्चा

चंदगड /प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ) : अतिवृष्टी,वन्यजीवांचा वाढता संचार आणि काही कारखानदारांकडून होणाऱ्या ऊसाच्या काटामारीमुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्या अडचणीची दखल घेत कार्वे, ता. चंदगड येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विशेष बैठक आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.




बैठकीत शेतकऱ्यांनी अतिवृष्टी, जंगली प्राण्यांचे हल्ले, FRP कमी दाखवणे, तसेच ऊस काटामारीसारख्या गैरप्रकारांबाबत सविस्तर तक्रारी मांडल्या. यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने किमान ₹3600/- प्रति टन ऊस दर मिळावा अशी ठाम मागणी करण्यात आली.

आमदार शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच स्पष्ट आश्वासन दिले की—
🔹 चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील सर्व साखर कारखानदारांशी तातडीने बैठक घेऊन ऊस दर वाढवण्याची मागणी केली जाईल.
🔹 प्रत्येक कारखान्यावर शासनमान्य काटा स्वतःच्या देखरेखीखाली बसविण्यात येईल, जेणेकरून काटामारीला आळा बसेल.
🔹 “मी स्वतः शेतकरीपूत्र आहे… शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सर्व प्रयत्न करेन,” अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला.


या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी तसेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शांताराम (बापू) पाटील, एम. टी. कांबळे, भावकू गुरव, दीपक पाटील, शंकर मनवाडकर, नाना डसके, अशोक कदम,  संग्राम अडकूरकर यांसह अनेक पदाधिकारी, शेतकरी  उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णायक उपाययोजना करण्यासाठी झालेली आजची बैठक ऊस उत्पादकांसाठी नवी आशा निर्माण करणारी ठरली आहे.

Post a Comment

0 Comments