दोन हत्तींच्या वावरामुळे भीतीचे वातावरण
(भात, ऊस आणि नाचणा पिकाचे प्रचंड नुकसान—शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी,वन विभागाने पंचनामा पूर्ण केला; हत्ती हुसकावण्यासाठी तातडीच्या उपायांची मागणी)
चंदगड/प्रतिनिधी : पार्ले-पाटणे परिसरात राजा हत्ती दाखल झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन दिवसांपासून दोन हत्तींचा मुक्त संचार सुरू असून, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.हत्तींच्या हल्ल्यामुळे या परिसरातील भात, नाचणा आणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकाचा पोताच बदलून टाकणाऱ्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असून, अनेकांचे महिनेभराचे परिश्रम व हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या ऊस तुटणीचा हंगाम दोन ते तीन महिने लांब असल्याने, या काळात हत्ती पुन्हा शिवारात परतण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे.वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा केला आहे. मात्र, हत्तींचा मुक्काम वाढण्याची शक्यता असल्याने भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे.उन्हाळी हंगामासाठी भुईमूग, बिनीस, मिरची, मका अशी पिके वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
परिसरातील नागरिक आणि शेतकरी वन विभागाकडे मागणी करत आहेत की —
दोन हत्ती तात्काळ हुसकावून लावावेत
पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तत्काळ आर्थिक दिलासा द्यावा
भविष्यातील हत्तींच्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात
हत्तींचा त्रास वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, येत्या काही दिवसांत या परिस्थितीवर वन विभाग काय पावले उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments