दयानंद काणेकर विरुद्ध सुनील काणेकर,अल्पसंख्याक व महिलांचे मतदान ठरणार निर्णायक
नगरपंचायत निवडणुकीला पुन्हा एकदा चंदगड शहराचा जुना पॅटर्न
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड नगरपंचायत निवडणूक यंदा सर्वाधिक रंगतदार ठरणार आहे. कारण महायुतीतीलच प्रमुख घटक असलेले भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.त्यामुळे ही लढत फक्त पक्षांची नाही तर महायुतीतील बिघाडी आणि नव्या राजकीय समीकरणांची बनली आहे.राजकीय समीकरणात मोठा बदल घडवत माजी आमदार राजेश पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर आणि काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांनी एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन केली.
या नव्या आघाडीचा परिणाम फक्त चंदगडच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात उमटताना दिसत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या रणनीतीचे हे पडसाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.राजर्षी शाहू आघाडीकडून दयानंद काणेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.तर भाजपकडून आमदार शिवाजी पाटील यांनी सुनील काणेकर यांचं नाव घोषित केलं.
म्हणजेच मागील निवडणुकीतील “काणेकर विरुद्ध काणेकर” लढत यंदाही रिपीट!
मागील वेळी सुनील काणेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता; तर प्राची काणेकर यांचा विजय त्यांच्या पती दयानंद काणेकर यांच्या मेहनतीमुळे झाला होता.आता मात्र यंदा पतीच थेट रणांगणात उतरल्याने लढत अधिक रोमहर्षक झाली आहे.महायुतीत घटक असूनही भाजपने यावेळी स्वबळाचा नारा दिला आहे.आमदार शिवाजी पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरात स्वतः प्रचारनियोजनाची धुरा सांभाळली आहे.त्यामुळे निवडणुकीला रंगत वाढत आहे.तर दुसरीकडे 5 वर्ष चंदगड नगरपंचायतीचा कारभार चालवणारे व नेहमी लोकांच्या सेवेत असणारे दयानंद काणेकर यांना पुन्हा एकदा समाजसेवक, उद्योजक सुनील काणेकर यांच्याशी सामना करावा लागनार आहे.एकतर जातीय गणितं,घराघरात भेटी आणि गाठीभेटी यावर ते स्वतः लक्ष ठेवत आहेत.दुसरीकडे, राजर्षी शाहू आघाडीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस एकत्र आल्याने महायुतीतील भाजप-शिवसेना हे एकाकी पडल्याचं स्पष्ट दिसत आहे.चंदगड शहरातील अल्पसंख्यांक मतांची टक्केवारी यंदा निर्णायक ठरणार आहे.यासोबतच महिला मतदारांचा कल कोणाकडे वळतो हेही महत्त्वाचं ठरणार आहे. मागील काळात महिलांनी निर्णायक भूमिका बजावली असून यंदाही त्यांचा तितकाच प्रभाव अपेक्षित आहे.ही निवडणूक केवळ नगरपंचायतीपुरती मर्यादित नसून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनाही दिशा देणारी मानली जाते. कोण कोणाशी हातमिळवणी करतो, कोण कुणाशी भिडतो आणि शेवटी कोणाचं गणित बसतं-हेच पुढील राजकीय चित्र ठरवणार आहे.
चंदगडची नगरपंचायत निवडणूक यंदा महा-आघाड्या, अंतर्गत संघर्ष आणि बदलत्या निष्ठांनी भरलेली सुपरहिट लढत ठरणार आहे.जनता कोणाला सोबत घेते आणि कोणाला धडा शिकवते याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.आणि नक्कीच, ही निवडणूक पुढील संपूर्ण स्थानिक स्वराज्य राजकारणाला मार्गदर्शक ठरणार, यात शंका नाही.

Post a Comment
0 Comments