Type Here to Get Search Results !

निवडणुकीच्या रिंगणातून माघार नाही-कोल्हापूरात तृतीय पंथीयांचा ईशारा


(समाजाच्या हक्कांसाठी लढणार,कोल्हापूरात तृतीयपंथीय समाजाचा निर्णय,पत्रकार परिषदेत मांडली भूमिका)


चंदगड/प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये तृतीय पंथीय समाजाच्या हक्कांसाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. मैत्री HIV/AIDS संघटना, कोल्हापूर यांच्या वतीने आज जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत तृतीय पंथीय समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत ठोस भूमिका मांडण्यात आली असून “आम्हाला केवळ दया नव्हे, तर अधिकार हवेत! आणि हा अधिकार मिळेपर्यंत आम्ही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नाही!” असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे.


मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर तसेच सदस्य शिवानी गजबर  यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आतापर्यंत तृतीय पंथीय समाजाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात न्याय मिळालेला नाही. शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरच्या भूमीतून या ऐतिहासिक लढ्याला सुरुवात होत आहे.


राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांना वास्तवात आणण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेत काही प्रभाग तृतीय पंथीय समाजासाठी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.*


*संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे-


*1️⃣ कोल्हापूर महानगरपालिकेतील काही प्रभाग तृतीय पंथीय समाजासाठी आरक्षित करावेत.*


*2️⃣ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तृतीय पंथीयांचे प्रतिनिधित्व कायदेशीररित्या निश्चित करावे.*


*3️⃣ शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात तृतीय पंथीय समाजासाठी स्वतंत्र योजना राबवाव्यात.*


*4️⃣ समाजात तृतीय पंथीयांविषयी सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिमा राबवाव्यात.*


संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की —

*“जर शासन आणि निवडणूक आयोगाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर तृतीय पंथीय समाज स्वतः उमेदवार उभे करून थेट निवडणूक लढवेल. हा संघर्ष आमच्या अस्तित्वाचा आहे, आणि आता माघार नाही!”*


पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, हा संघर्ष कुणाविरुद्ध नाही, तर समानतेच्या तत्त्वासाठी आहे. तृतीय पंथीय समाज हा समाजाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यांना राजकीय निर्णय प्रक्रियेत स्थान देणं ही शासनाची जबाबदारी आहे.*


*शिवराज्याचा वारसा असलेल्या कोल्हापुराने या लढ्याचं नेतृत्व घेतलं आहे, आणि हा आवाज आता महाराष्ट्रभर गुंजणार आहे.*


ही पत्रकार परिषद कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडली. अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून तृतीय पंथीय समाजाने पुन्हा एकदा आपली ओळख, सन्मान आणि अधिकार मिळवण्यासाठी एकसंघ होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.*


ऐतिहासिक पार्श्वभूमी : १९६५ साली बाळू चौगुले (देवमामा) यांनी कोल्हापुरातून निवडणूक लढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र त्या काळातील सामाजिक परिस्थिती पाहता त्यांना यशस्वी माघार घ्यावी लागली होती.*


त्या ऐतिहासिक प्रयत्नाचे साक्षीदार असलेले शिवाजीराव रामचंद्र आळवेकर आजही हयात आहेत. आणि त्यांच्याच हयातीत बाळू चौगुले (देवमामा) यांचे अपूर्ण स्वप्न तब्बल ६० वर्षांनंतर साकार होण्याच्या उंबरठ्यावर आहे,म्हणूनच यावेळी माघार नाही हा निर्धार समाजाच्या प्रत्येक सदस्याने दृढपणे व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments