चंदगड तालुक्यातील शाहिरावरील प्रेम आणि सामाजिक भानाचे जिवंत उदाहरण
चंदगड/राजेंद्र शिवणगेकर : माणुसकी काय असते,सामाजिक भान कसे जपायचे आणि ‘मित्र’ नावाच्या नात्याचा खरा अर्थ कोणाला म्हणायचा—याचे अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण चंदगड तालुक्यात समोर आले. कानडी येथील लोकप्रिय शाहिर आणि लाडका वर्गमित्र कै. श्रीपती कांबळे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देत मित्रमैत्रिणींनी मदतीचा हात पुढे केला. दुःखाच्या काळात आधार देणारी ही मदत फक्त आर्थिक नव्हे, तर मानवी संवेदनेची जिवंत साक्ष ठरली.
वर्गमित्रांच्या या उपक्रमात सर्वप्रथम कुटुंबाच्या तातडीच्या गरजांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर खालील स्वरूपात आर्थिक आणि साहित्यिक मदत करण्यात आली
दिवाण (बसण्याची सोय)दोन खुर्च्या रु. 25,000/- थेट श्रीपती यांच्या पत्नींच्या बँक खात्यावर जमा व रु. 2,900/- रोख स्वरूपात हस्तांतरित ही मदत देताना मित्रांनी फक्त वस्तू किंवा रक्कम दिली नाही, तर कुटुंबाच्या मनातील असुरक्षितता, एकटेपणा आणि दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला.
कै. श्रीपती कांबळे हे चंदगड तालुक्यातील कला क्षेत्रातील ओळखले जाणारे शाहिर होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्न, मानवी भावना आणि लोकजीवन आपल्या शब्दांत जिवंत केले. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही जाण ठेवून वर्गमित्रांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन सहानुभूती, आधार आणि मदतीची उब दिली.या मदतकार्यावेळी सोनाली पिळणकर,सुभाष पेडणेकर,प्रतिभा डुरे, अनिल कांबळे, रामकृष्ण गडकरी, राजू शिंदे, शैलेश सावंत,राजवीर सावंत आणि विठ्ठल चिगरी व इतर मित्रमैत्रिणी उपस्थित होते.
या सर्वांनी मिळून कुटुंबाच्या गरजा समजून घेत पुढील काळातही आवश्यक मदत करण्याची तयारी दर्शवली. मित्रांच्या या संवेदनशील उपक्रमामुळे कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.आजच्या धावपळीच्या काळात माणसामाणसातील नाती दुरावत चालली आहेत, अशा परिस्थितीत मैत्रीचे असे जिव्हाळ्याचे दर्शन समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणारे आहे. शाहिर श्रीपती यांनी आपल्या कलाकृतींनी लोकांना जोडले आणि त्यांच्या मित्रांनी मानवी नात्यांनी त्या वारशाला पुढे नेले.
“मित्र संकटात साथ देतो, तेव्हा नात्याला अर्थ प्राप्त होतो”-हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.कै. श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाला दिलेला हा आधार फक्त एक मदतकार्य नसून,मानवी संवेदनांचे जतन,सामाजिक भानाचा प्रत्यय आणि दातृत्वाच्या संस्कृतीचा जिवंत आदर्श म्हणून चंदगड तालुक्यातील या मित्रपरिवाराच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments