Type Here to Get Search Results !

स्वाभिमानीच्या लढ्याला यश-ओलम शुगरने ३५०० रु. पहिली उचल जाहीर


(तीन तालुक्यांत १५ दिवसांचे आंदोलन; ठिय्या आंदोलनामुळे गळीत हंगाम ठप्प,स्वाभिमानीच्या रेट्याने निर्णयाला कलाटणी)


चंदगड/राजेंद्र शिवणगेकर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ३५०० रूपयांच्या ऊसदराच्या मागणीला मान्यता देत अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला. मात्र चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील पाच साखर कारखान्यांनी संघटितरित्या फक्त ३४०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली होती. या निर्णयाला स्वाभिमानीने जोरदार विरोध करत ओलम शुगर कारखान्यावर कालपासून बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले होते.


गेल्या १५ दिवसांपासून राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली तीनही तालुक्यांमध्ये ऊसदर चळवळ पेटलेली होती. ठिय्या आंदोलनामुळे दोन दिवसातच ओलमचा संपूर्ण गळीत हंगाम ठप्प झाला. हजारो शेतकऱ्यांच्या दबावामुळे कारखाना व्यवस्थापन पूर्णपणे अडचणीत आले.कारखानदार आणि काही लोकप्रतिनिधींच्या हट्टी भूमिकेमुळे तणाव अधिकच वाढला. दरम्यान, स्वाभिमानीच्या रेट्यामुळे शेवटी ओलम कारखाना व्यवस्थापनाने ३४०० + १०० मिळून ३५०० रूपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी ६ वाजता लेखी पत्र देत हा दर अधिकृतपणे जाहीर केला.


भिजलेल्या शेतकऱ्यांच्या हजारोंच्या गर्दीसमोर हा विजय ऐतिहासिक ठरला. लेखी निर्णय मिळताच स्वाभिमानीने ठिय्या आंदोलन मागे घेतले आणि दोन दिवस गेटपाशी अडकून पडलेली ऊस वाहने पुन्हा गळीतासाठी कारखान्यात दाखल होऊ लागली.




यावेळी कर्नाटकाचे माजी मंत्री शशिकांत नाईक, काडसिद्धेश्वर स्वामी, राजेंद्र गड्यान्नावर, प्रा. दीपक पाटील, स्वस्तिक पाटील, जगन्नाथ हुलजी, विश्वनाथ पाटील, गजानन राजगोळकर, गोपाळ गावडे, विरुपाक्ष कुंभार, पिंटू गुरव तसेच कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजच्या संघर्षाने शेतकरी आंदोलनाचे बळ पुन्हा एकदा जिवंत केले असून, ओलमचा निर्णय इतर कारखान्यांसाठी ‘दिशादर्शक’ ठरणार—अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments