चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : गोवा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा चंदगडवासीयांचे मार्गदर्शक प्रमोदजी सावंत यांनी आज ईनाम सावर्डे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चंदगडवासीयांचा सन्मान केला. यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री सावंत यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
मुख्यमंत्री सावंत यांनी भेटीदरम्यान ८४ खेड्यांचे दैवत श्री रवळनाथाचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. चंदगड तालुक्याचा धार्मिक, सांस्कृतिक इतिहास जाणून घेत त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला.या भेटीत स्थानिक प्रतिनिधींनी मौजे कोलिक (ता. चंदगड) ते गोवा राज्य जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत महत्त्वाचे निवेदन मुख्यमंत्री सावंत यांना सादर केले.
सध्या हा रस्ता पूर्णपणे जिर्णावस्थेत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले, अनेक निरपराध नागरिकांचा जीव गेला तर काहीजण अपंगत्वाला सामोरे गेले आहेत.हा रस्ता सुधारला तर महाराष्ट्र–गोवा सीमावर्ती भागातील दळणवळण, व्यापार, पर्यटन आणि शेतीव्यवहारांना मोठी चालना मिळेल. त्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून दुरुस्तीचे काम मार्गी लावावे, अशी मागणी चंदगडवासीयांच्या वतीने करण्यात आली.या निवेदनावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी चंदगड नगरपंचायत निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.चंदगड नगरपंचायतीवर भाजप–युतीची सत्ता प्रस्थापित व्हावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्री सावंत यांची ही सदिच्छा भेट चंदगड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली.


Post a Comment
0 Comments