(चंदगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश,३ हजारांची लाच स्वीकारताना खाजगी इसम रंगेहाथ अटकेत)
संजय धनके/चंदगड प्रतिनिधी : शेतजमिनीच्या मोजणीचा अंतिम नकाशा मिळवून देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर पथकाने मोठी कारवाई करत विजय आप्पासाहेब कानडे (वय ३२, रा. बाळगुंदी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या खाजगी इसमाला रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांनी आपल्या शेतजमिनीच्या गटाची मोजणी करून नकाशा मिळावा यासाठी भूमिअभिलेख कार्यालय, चंदगड येथे रितसर अर्ज केला होता. या अर्जानुसार संपूर्ण गटाची मोजणी करून हद्दी निश्चित करणे व अंतिम नकाशा काढून देण्यासाठी विजय कानडे याने स्वतःला भूमिअभिलेख कार्यालय चंदगड येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ओळखीचा असल्याचे भासवले. विशेष म्हणजे तो सप्टेंबर २०२५ पर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होता; मात्र त्यानंतरही आपण कार्यालयात कार्यरत असल्याचा बनाव करून त्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
मोजणीचे काम करून देतो व फायनल नकाशा मिळवून देतो, असे सांगून आरोपीने तक्रारदाराकडे यापूर्वी ८ हजार रुपयांची मागणी केली होती व त्यातील काही रक्कम आधीच स्वीकारली होती. उर्वरित ३ हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली.तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोने पडताळणी केली असता, आरोपी विजय कानडे याने शेतजमिनीच्या मोजणीबाबत बोलताना “रेकॉर्ड दाखवतो, मोजून येतो, काय बसतंय ते पाहतो” असे म्हणत यापूर्वी लाच मागितल्याचे व पैसे घेतल्याचे तसेच आता उर्वरित ३ हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचे निष्पन्न झाले.यानंतर सापळा रचण्यात आला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून आरोपीने ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी आरोपीविरोधात चंदगड पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे व श्री. अर्जुन भोसले, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत राजेंद्र सानप (पोलीस निरीक्षक), पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. संदीप काशीद, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. कृष्णा पाटील आदी अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.दरम्यान, लाचखोरी व अपसंपदेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२०२१, हेल्पलाईन क्रमांक १०६४ तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध असल्याचेही कळविण्यात आले आहे.
या कारवाईमुळे चंदगड तालुक्यात खळबळ उडाली असून, सरकारी कार्यालयांच्या नावाने लाच मागणाऱ्या दलालांवर करडी नजर ठेवली जात असल्याचा स्पष्ट संदेश अँटी करप्शन ब्युरोने दिला आहे.

Post a Comment
0 Comments