राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन २०२६ च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) व पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीत मतदार यादीतील दुरुस्ती, पडताळणी व अद्ययावतीकरण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सन २००२ च्या मतदार यादीतील वडिलांची नावे आणि सन २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील मतदार यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट करणे अत्यावश्यक असल्याने, प्रत्येक मतदाराने आपले नातेसंबंध दर्शविणारे आवश्यक पुरावे केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक राहणार असल्याची माहिती देण्यात आली.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ज्या मतदान केंद्रांवर मतदारसंख्या बाराशे (१२००) पेक्षा अधिक आहे, अशा मतदान केंद्रांचे विभाजन करून तेथे दोन स्वतंत्र मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. नव्याने निर्माण झालेल्या केंद्रांसाठी सहाय्यक बीएलओंची नियुक्ती करण्यात आली असून, तसेच बाराशेपेक्षा अधिक मतदारसंख्या असलेल्या केंद्रांवर चौथा मतदान अधिकारी म्हणून बीएलओ सहाय्यक कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद मतदानासाठी मतदार चिट्ट्या देण्यात येणार असून, या चिट्ट्यांचे वाटप संबंधित बीएलओ यांचेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच एसआयआर (SIR) प्रणालीद्वारे सन २००२ च्या मतदारांची सन २०२४ च्या मतदार यादीशी मॅपिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.विशेष मार्गदर्शनात असे नमूद करण्यात आले की, सन २००२ च्या मतदार यादीत ज्या विवाहित महिलांची नावे समाविष्ट नाहीत, त्यांनी आपल्या माहेरील वडिलांचे सन २००२ मधील मतदार यादीतील नावाचा पुरावा सादर करून मॅपिंग करून घ्यावे.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक टेक्निकल असिस्टंट निहाल मुल्ला यांनी बीएलओ व पर्यवेक्षकांना निवडणूक प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले. मतदार यादी तयार करताना पारदर्शकता, अचूकता व निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.दरम्यान, २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन असल्याने, या दिवशी सर्व बीएलओंनी आपल्या-आपल्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहून मॅपिंगसाठी आवश्यक पुरावे गोळा करून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करावी, अशा स्पष्ट सूचना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिल्या.
यावेळी निवडणूक नायब तहसीलदार शशिकांत किल्लेदार व महसूल सहाय्यक दीपक आंबी यांच्यासह सर्व बीएलओ व पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व त्रुटीविरहित पार पाडण्यासाठी ही बैठक अत्यंत मार्गदर्शक व उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments