चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत येणारा गवसे पंचायत समिती मतदारसंघ यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. याठिकाणी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगणार असल्याचे स्पष्ट चित्र असून, राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ. रेणुका दीपक कांबळे (कोकरे) यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
या उमेदवारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रेणुका कांबळे यांना लाभलेले त्यांचे पती प्रा. दीपक कांबळे यांचे खंबीर नेतृत्व. प्रा. कांबळे हे खेडूत शिक्षण संस्थेच्या चंदगड येथील नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात गुंतलेला एक 'प्राध्यापक' जेव्हा अन्यायाविरुद्ध 'ब्लॅक पँथर'च्या माध्यमातून मैदानात उतरतो, तेव्हा परिवर्तनाची नांदी निश्चित असते. तहसीलदार कार्यालय असो वा पोलीस स्टेशन, गोरगरीब आणि मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेला लढा आज त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे.
'झांबरे-उमगाव' भागाला मिळणार हक्काचे नेतृत्व?
आजवरच्या राजकीय इतिहासात झांबरे-उमगाव भागातील मागासवर्गीय समाजाला हक्काचे प्रतिनिधित्व मिळण्याची ही पहिलीच मोठी संधी निर्माण झाली आहे. रेणुका कांबळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि कर्तबगार चेहरा समोर आल्याने या भागातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. "आमच्या भागाचा आवाज आता थेट सत्तेच्या सभागृहात घुमणार," अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
केवळ घोषणाबाजी न करता, ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने या मतदारसंघाचा कोपरा न कोपरा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि घराघरात पोहोचण्याची जिद्द यामुळे ही निवडणूक 'कांबळे' कुटुंबीयांसाठी विजयाची मोठी संधी मानली जात आहे.
यावेळी बोलताना प्रा. दीपक कांबळे यांनी आपला निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, "माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या सामाजिक कामाची पावती म्हणून समाजाने ही उमेदवारी उचलून धरली आहे. केवळ निवडणूक जिंकणे हा आमचा हेतू नाही, तर मागासवर्गीय समाजाच्या कामासाठी कुठेही कमी न पडता, सर्वांना अभिमान वाटेल असे आदर्श काम करून दाखवणे हे आमचे ध्येय आहे."प्रामाणिकपणा, उच्च विद्याविभूषित कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची वृत्ती यामुळे रेणुका दीपक कांबळे यांचे पारडे सध्या जड दिसत आहे. गवसे मतदारसंघातील मतदार यावेळी एका 'प्राध्यापकाच्या' सामाजिक कार्याला आणि 'कर्तव्यदक्ष' महिला उमेदवाराला साथ देण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment
0 Comments