Type Here to Get Search Results !

माडखोलकर महाविद्यालयाकडून 'वार्षिक क्रीडा महोत्सवाचा' शुभारंभ


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील नामांकित र भा माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'वार्षिक क्रीडा महोत्सवाचा' अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी मैदानावर खेळाडूंचा उत्साह आणि क्रीडाप्रेमींची गर्दी लक्षवेधी होती.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा संचालक प्रा. एस. एम. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्रीडा विभागाचा वार्षिक प्रगती अहवाल सादर केला. त्यांनी वर्षभरात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची माहिती देतानाच, महाविद्यालयाच्या खेळाडूंनी कशा प्रकारे विविध स्तरांवर यश मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, याचे सविस्तर वर्णन केले. खेळाडूंच्या जिद्दीचे आणि त्यांच्या परिश्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.


उद्घाटक प्रा. आर. पी. पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "क्रीडांगण हे आयुष्यातील संघर्षाची पहिली पायरी आहे. येथे हरलेला खेळाडू पुन्हा उभं राहायला शिकतो आणि जिंकलेला खेळाडू संयम शिकतो," अशा शब्दांत त्यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष न देता शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांकडे वळले पाहिजे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.या आनंददायी सोहळ्यावर एका दु:खद घटनेची सावलीही दिसून आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण क्रीडांगणावर शांतता पसरली. महोत्सवाच्या दरम्यान त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून दिवंगत नेत्याला मानवंदना दिली.


कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केला. आपल्या भाषणात त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतानाच, क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो, असे मत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. एन. एस. मासाळ यांनी आपल्या खास शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी मानले. पाहुण्यांची ओळख व खेळाबद्दलची नियमाबद्दलची माहिती स्टाफ सेक्रेटरी प्रा. व्ही. के. गावडे यांनी करून दिली. 


या सोहळ्याला प्रा. आर. व्ही. आजरेकर, डॉ.टी ए कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, डॉ आर एन साळुंके, डॉ जी वाय कांबळे, डॉ एस एस सावंत, प्रा.आर एस पाटील श्री. एल. एन. गायकवाड, डॉ. निकम यांच्यासह महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर विविध सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांना सुरुवात झाली असून, संपूर्ण छत्रपती शिवाजी क्रीडांगण खेळाडूंच्या घोषणांनी दुमदुमून गेले आहे.

Post a Comment

0 Comments