Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद हेच तरुणांचे खरे प्रेरणास्थान-डॉ.एस.एन.पाटील


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात कला व क्रीडा शाखेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने 'युवा दिन' साजरा करत महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांनी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, "स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी छत्रपती शिवरायांसारखा युगपुरुष घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ या केवळ माता नव्हत्या, तर त्या एक कुशल प्रशासक आणि मार्गदर्शक होत्या. आजच्या पिढीने त्यांच्याकडून संयम आणि दूरदृष्टी शिकणे आवश्यक आहे."


विवेकानंदांच्या कार्यावर प्रकाश टाकताना ते पुढे म्हणाले, "स्वामी विवेकानंदांनी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली. 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका' हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. तरुणांनी केवळ तंत्रज्ञानात पुढे न जाता आपल्या नैतिक मूल्यांची जोपासना केली पाहिजे. जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदांचे विचार हीच खऱ्या अर्थाने राष्ट्राची शक्ती आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.


प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात या दोन्ही महापुरुषांच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमांची माहिती देत या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या केवळ प्रतिमा पुजू नयेत, तर त्यांच्यातील जिद्द आणि राष्ट्रप्रेम आपल्या आचरणात आणावे. शिस्त आणि ध्येयनिष्ठा हीच यशाची गुरुकिल्ली आहे."


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. के. पाटील यांनी  केले, तर आभार क्रीडा संचालक प्रा एस.एम.पाटील यांनी मानले.याप्रसंगी डॉ. एन. एस. मासाळ, डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. आर. के. सूर्यवंशी, डॉ. आर के तेलगोटे, प्रा. बाबली गावडे, प्रा. सोनाली पाटील यांच्यासह कला व क्रीडा शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments