2️⃣मुख्य बसथांब्यावर रास्ता रोको व साखळी उपोषणाला सुरुवात
3️⃣ बससेवा सुरू होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : तुडिये, तालुका चंदगड येथील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बेळगाव–तुडिये बससेवा सुरू करण्याचे आश्वासन देऊनही कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
गुरुवारी, दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून तुडिये येथील मुख्य बसथांब्यावर रास्ता रोको आंदोलनासह साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी २२ डिसेंबर रोजीही ग्रामस्थांनी बससेवेच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांच्या उपस्थितीत परिवहन अधिकाऱ्यांनी बेळगाव ते राकसकोप दरम्यान धावणारी बस २५ डिसेंबरपासून ठराविक वेळेत तुडियेपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते.मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही तुडियेकरिता बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या तुडिये गावातून बेळगाव–धामणे ही बस धावते. आजपासून उपोषण सुरू होणार असल्याची माहिती आधीच परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे आज धामणे बस सेवा सोडण्यात आली नाही. मात्र, बेळगाव–तुडिये बससेवा सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, तसेच बसेस अडवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या आंदोलनाबाबत ग्रामपंचायत तुडिये यांच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत बससेवा सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनात सरपंच विलास सुतार, उपसरपंच अशोक पाटील, सदस्य मनोहर कणगुटकर, सविता हुलजी, रेश्मा सुतार, प्रियांका झाजरी, गणपती कोरजकर, अरुण पाटील, प्रमोद गुरव, के. एस. पाटील, कल्लाप्पा हुलजी, लक्ष्मण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.दरम्यान, प्रशासन या आंदोलनाची दखल कधी घेणार, आणि तुडियेकरांना बससेवेचा दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments