Type Here to Get Search Results !

समाज प्रबोधन आणि समाज घडवण्याचे काम पत्रकार करतात-जेष्ठ नेते गोपाळराव पाटील


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : पत्रकार हे समाजाचे आरसे असून, समाज प्रबोधनाबरोबरच समाजाचे वास्तव चित्र जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करत असतात, असे प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. गोपाळराव पाटील यांनी केले.ते हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


पत्रकारांच्या लेखणीत मोठी ताकद असून, अचूक, सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यांमधून समाजात जनजागृती घडवली जाते. चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन काम करावे, तसेच वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाळराव पाटील यांच्या शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, तसेच विविध वृत्तपत्रे व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


दौलत विश्वस्त संस्थेच्या वतीने चंदगड तालुक्यातील विविध वृत्तपत्रांसाठी कार्यरत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असतात, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी तरुण भारतचे विजयकुमार दळवी, लोकमतचे निंगाप्पा बोकडे, दै. पुढारीचे संदीप तारीहाळकर, सी एल माझाचे संतोष सुतार, युवा संवादचे संपादक महेश बसापुरे, एस एम न्यूजचे शहानुर मुल्ला ,ताडोबा गावडे यांच्यासह अनेक पत्रकारांचा शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.


कार्यक्रमात बोलताना विजयकुमार दळवी यांनी पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच चंदगड तालुक्याच्या निसर्ग संवर्धनाची गरज व्यक्त केली.प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी प्रसिद्धी माध्यमातून संस्थेचा, महाविद्यालयाचा व तालुक्याचा विकास साधता येतो, असे सांगत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता निर्माण करताना शिक्षक व पालकांचे ऋण विसरू नये, असा संदेश दिला.या कार्यक्रमास कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ. व्ही. व्ही. कोलकार यांनी केले तर आभार प्रा. जी. जे. गावडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments