Type Here to Get Search Results !

अडकूरजवळ १४ महिन्याच्या बालकावर कोल्ह्याचा हल्ला; जखमी बालकावर कोल्हापूर येथे उपचार


चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : नेसरी -चंदगड मार्गावरील अडकूरजवळ रस्ते बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पालात राहणाऱ्या १४ महिन्यांच्या बालकावर कोल्ह्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत बालक जखमी झाले असून त्याच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण अरुण चव्हाण (वय 1 वर्षे 3 महिने) हे बालक पालाबाहेर वडिलांसोबत खेळत असताना अचानक कोल्ह्याने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी पालात असलेल्या इतर मजुरांनी तत्काळ धाव घेत कोल्ह्याला हुसकावून लावले. त्यानंतर जखमी बालकाला उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.


घटनेची माहिती मिळताच वनपाल ए. बी. पावसकर, पोलिस पाटील कल्लप्पा गुरव आणि भारती जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच चंदगडचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनीही सीपीआर रुग्णालयात जाऊन बालकाची पाहणी केली.


वन खात्याच्या पथकाने ड्रोनच्या साहाय्याने परिसराची पाहणी करून हल्ला कोल्ह्याकडूनच झाला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. अडकूरजवळ शिवशक्ती हायस्कूल परिसरात रस्ते बांधकामासाठी आलेले काही मजूर पालात वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी बालक पालाबाहेर खेळत असताना हा प्रकार घडला.


दरम्यान, याच परिसरात यापूर्वीही कोल्ह्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments