Type Here to Get Search Results !

पुस्तकांची गुढी उभारून समाज जागृतीचा प्रयत्न,हुंदळेवाडी येथील शिक्षक दांपत्याचा उपक्रम!

 


नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : गुढी पुस्तकांची,गुढी विचारांची या संकल्पनेने प्रेरीत होऊन हुंदळेवाडी ता. चंदगड येथील प्राध्यापक रविंद्र बाबुराव पाटील व प्राथमिक शिक्षिका सुजाता रविंद्र पाटील या दाम्पत्याने गुढी पाडवा सण पुस्तकांची गुढी उभा करून साजरा केला.सलग पाच वर्षांपासून ते  घरासमोर पुस्तकांची गुढी उभी करून वाचनविषयक संदेश समाजासमोर आणत आहेत.जवळपास शंभर पेक्षाही जास्त पुस्तके एकत्रित करून पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.


पुस्तके वाचल्यामुळे आपली ज्ञानसंपदा वाढते. विविध विषयांची माहिती मिळते आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो.पुस्तके ही माणसाची खरी आणि निस्वार्थी मित्र असतात. ती कधीही आपल्याला चुकीचा मार्ग दाखवत नाहीत, उलट योग्य दिशेने मार्गदर्शन करतात. पुस्तकांशी मैत्री केल्यामुळे माणसाच्या विचारांना विस्तार मिळतो आणि ज्ञानाची नवी दारे उघडतात.


आज मोबाईल च्या युगात वाचन संस्कृती लयाला गेलेली दिसते,बहुतांश तरुण पिढी इंटरनेट वॉटसअप च्या विळख्यात अडकलेली आहे,वाचन खूप कमी झालेले आहे,व्यक्ती व्यक्तींमधील संवाद हरवले आहेत,तरुणांमध्ये एकटेपणा वाढलाय,नैराश्य रूपी शत्रू चितावनी देतोय,अशा अवस्थेत पुस्तकांशी तरुणांनी मैत्री करायला हवी,पुस्तके वाचनातून ज्ञान समृद्ध होईल,ग्रंथ हेच गुरु आहेत आणि भविष्यातही राहतील,भविष्यातील भारताचे स्वप्न पाहताना ज्ञानरुपी शिक्षणाला खूप महत्वाचे स्थान असणार आहे,तरुणांनी पुस्तकांशी घटट मैत्री करावी,वाचन वाढवावे,ज्ञानसमृद्ध व्हावे,ज्ञानदान करावे,घरातील भावी पिढीला अभ्यासाची शिक्षणाची आवड निर्माण करावी अशा स्वरूपाचे संदेश देत  गावातील शाळकरी मुलांना /तरुण वर्गाला वाचनाची सवय लागावी यासाठी गुढीपाडव्यानिमित्त महाराणी ताराबाई यांच्या 351 व्या जयंती वर्षानिमित्त महाराणी ताराबाईंच्या कार्यकर्तृत्वावर आधारित पुस्तकांचे वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करत समाज जागृतीचे कार्य या दाम्पत्याने केलेले आहे,ही बाब नक्कीच  कौतुकास्पद आहे.प्रा रविंद्र पाटील हे कमला कॉलेज कोल्हापूर येथे व पत्नी सुजाता पाटील या मराठी विद्यामंदीर किणी ता चंदगड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.आई सविता पाटील व वडील बाबूराव पाटील यांच्या प्रेरणेतून सदर उपक्रम राबवण्यात आला.


पाटील यांचे जवळपास सर्व कुटुंबीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून नाविन्यपूर्ण उपक्रमशील कुंटूब म्हणून त्यांची ओळख आहे.सोशल मिडिया मनोरंजनासाठी चांगला असतो, पण तो आपल्या आयुष्यावर ताबा मिळवत असेल, तर सावध होणं गरजेचं आहे. योग्य प्रमाणात वापर केला, तरच तो आपल्यासाठी फायदेशीर ठरतो.सोशल मिडीया,इंटरनेटचा अतिवापर टाळून पुस्तकांशी मैत्री केल्यास नक्कीच व्यक्ती व समाजाची प्रगती होऊ शकेल असे मत यावेळी प्रा.रविंद्र पाटील यांनी नेसरी प्रतिनिधी संजय धनके यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments